महालक्ष्मी एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मध्यराञी एक धक्कादायक प्रसंगाला सामोर जावं लागलं आहे. मुंबईहून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेसवर चक्क दरोडा पडल्याची घटना समोर आली आहे. सातारा जिल्ह्यातील सालपे रेल्वे स्थानकाजवळ रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. प्रवासी गाढ झोपेत असताना चोरट्यांनी सिग्नल यंत्रणेच्या वायर कापून रेल्वेगाडी थांबवली आणि दोन महिला प्रवाशांचे सोन्याचे दागिने हिसकावून नेले. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
सिग्नल यंत्रणेच्या वायर कापल्या
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-मिरज रेल्वे मार्गावरील साताऱ्यात सालपे रेल्वे स्थानकाजवळ महालक्ष्मी एक्स्प्रेसवर दरोड्याची घटना घडली आहे. सिग्नल यंञणेत बिघाड झाल्याने रेल्वे थांबली होती अशी माहिती आहे. पण दरोडा टाकण्यासाठीच चोरट्यांनी सिग्नल यंत्रणेच्या वायर कापल्या होत्या असही म्हटलं जात आहे.चोरट्यांनी वायर कापून महालक्ष्मी एक्स्प्रेस 15 मिनिटे रोखून धरली. रेल्वे थांबल्यानंतर चोरट्यांनी खिडकीतून हात घालून दोन महिला प्रवाशांचे 52 हजार 600 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हिसकावून नेले.
नेमकी घटना काय घडली?
मुंबई कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस आपल्या नियमित वेळेनुसार पुणे ते कोल्हापूर दरम्यान धावताना लोणंदनंतर सालपाकडे स्थानकादरम्यान धावताना सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड करून मध्यरात्री अडीचच्या सुमारास महालक्ष्मी एक्सप्रेस सिग्नल अभावी थांबल्यानंतर हा प्रकार घडला. रेल्वे अचानक थांबल्याने कोणाला काहीच समजले नाही. अज्ञात चोरट्यांनी रेल्वे मार्गाच्या सिग्नलमध्ये बिघाड केल्यामुळे महालक्ष्मी एक्सप्रेस सालपा-स्थानकाच्या मागे थांबली यावेळी या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी एक्स्प्रेसच्या एस-2, एस-3 आणि एस-5 डब्यांमधून प्रवास करणाऱ्या मुंबईतील रहिवासी सुनिता गोरक्षनात तुपे आणि सहप्रवासी सुरेखा खाडे (खोपोली) हे कौटुंबिक कार्यक्रमांसाठी कोल्हापूरला निघाले होते. या दरोडेखोरांनी त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने खिडकीचा आधार घेऊन हिसकावले.यावेळी महिलांनी आरडाओरड केल्यानंतर चोरटे पसार झाले.
चोरट्यांनी रेल्वेवरच दगडफेक केली
एवढंच नाही तर चोरी केल्यानंतर दरोडेखोरांनी पळ काढला. परंतु या चोरट्यांनी रेल्वेवरच दगडफेक केली. या दरोड्याच्या घटनेने प्रवाशांमध्ये मोठी दहशत पसरली. सिग्नल यंत्रणेत नेमका बिघाड कसा झाला, याचा प्रश्न प्रशासनाला पडला. तसेच हा दरोडा पूर्वनियोजित कट होता का, यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत. आता पोलिसांचं पथक हे पुढील कारवाईसाठी साताऱ्याला रवाना झाले आहेत. दिवाळीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
प्रकरणाची सखोल चौकशी सुरु
दरम्यान एक्स्प्रेसवर दरोडा पडल्याची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने पहाटे सव्वापाच वाजेपर्यंत दुरुस्ती करत सिग्नल यंत्रणा पूर्ववत केली. या सिग्नल तोडफोडीबाबत लोणंद आरपीएफमध्ये आणि दागिने चोरी प्रकरणी मिरज लोहमार्ग पोलिसांत स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरोड्यानंतर पोलिसांकडून श्वानपथक आणि फॉरेन्सिक टीमच्या मदतीने याचा सखोल तपास सुरू आहे.








