मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत प्रतापसिंह पाटील यांचा विजय झाला. विजयाचे चित्र स्पष्ट होताच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राजेश टोपे मतमोजणी केंद्रावर दाखल झाले. प्रतापसिंह पाटील यांचे अभिनंदन करण्यासाठी आलेल्या राजेश टोपे यांनी त्यांना गुलाल लावला. त्यानंतर विजयाची दाखवत जल्लोष करण्यात आला.
रात्री डॉ. प्रतापसिंह पाटील यांना १८ हजार १२४ च्या फरकाने विजयी घोषित
सलग तीन वेळा पदवीधर मतदारसंघातून निवडून येणारे राष्ट्रवादीचे नेते आणि महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पराभव झाला. केवळ १२ दिवसाच्या प्रचाराच्या जीवावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील ८५८७६ मते मिळवून विजयी झाले. चव्हाण यांना ६७हजार ७५२ एवढी मते पडली. पहिल्या पसंती अखेर पूर्ण न केल्याने सर्वांत कमी मते मिळालेल्या उमेदवारांच्या दुसऱ्या पसंतीच्या टप्प्याटप्प्याने हस्तांतर करत आणि उमेदवार वजा करत ३६ तासांहून अधिक काळ सुरू असणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेनंतर उशिरा रात्री डॉ. प्रतापसिंह पाटील यांना १८ हजार १२४ च्या फरकाने विजयी घोषित करण्यात आले.
सतीश गेम ओव्हर’, अशी मतदानात चिठ्ठी होती,
‘परफेक्ट नियोजन, करेक्ट कार्यक्रम’ अशा आशयाचे बॅनर देखील झळकवण्यात आले. हा महाविकास आघाडीचा विजय आहे. ‘आम्ही एकमेकांवर टीका केली नाही. मैत्रीपूर्वक ही लढत होती. मैत्रीमध्येच आम्ही लढलो. ही निवडणूक मतदारांनी हातात घेतली होती. त्यामुळे मी विजयाच्या उंबरठ्यावर आहे. अधिकृत विजयाची वाट बघावी लागेल”, अशी प्रतिक्रिया मतमोजणीत आघाडीवर असलेले महायुतीचे उमेदवार प्रतापसिंह पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. तर विजयासाठी अनेकांनी श्रेय घेत केलेली बॅनरबाजी चर्चेत आली. प्रतापसिंह पाटील यांनी विजयानंतर माध्यमांशी बोलताना “सतीश गेम ओव्हर’, अशी मतदानात चिठ्ठी होती, असं हसत सांगत विजयाचा आनंद व्यक्त केला.
महायुतीला जब्बर धक्का बसला
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रतापसिंह पाटील यांना निवडून येण्यासाठी निश्चित असलेला कोटा पूर्ण नव्हता. मात्र, सर्वाधिक मताधिक्य मिळवल्यानं त्यांचा विजय झाला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या मराठवाडा विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत महायुतीला जब्बर धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार डाॅ. प्रतापसिंह पाटील यांना पहिल्या पसंतीची 73,931 मिळाली आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) उमेदवार आणि विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांना 60,768 मते प्राप्त झाली आहेत. 88,558 मतांचा कोटा निश्चित असताना कोणत्याही उमेदवारानं विजयाचा कोटा पूर्ण न केल्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी करण्यात आली. ती रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सतीश चव्हाण हे मागील तीन टर्मपासून या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत होते. भाजपा आणि मित्र पक्षांच्या मदतीनं सलग चौथ्यांदा ते विधान परिषदेवर जातील, असा विश्वास व्यक्त केला जात होता. परंतु, ऐनवेळी उमेदवारीची संधी मिळालेल्या डॉक्टर पाटील यांनी नियोजनबद्ध प्रचाराची आखणी आणि बेरीजचे गणित करत चव्हाण यांच्यावर मात केली आहे.
प्रतापसिंह पाटील यांच्या विजयात अब्दुल सत्तार यांची भूमिका महत्त्वाची ठरली
दरम्यान, शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी प्रतापसिंह पाटील यांना दिलेला पाठिंबा त्यांच्या विजयासाठी निर्णायक ठरल्याची चर्चा समर्थकांमध्ये सुरू आहे. मतमोजणी केंद्राबाहेर विजयाचा गुलाल उधळण्यासाठी कार्यकर्त्यांकडून तयारी करण्यात आली असताना, अब्दुल सत्तार यांनी यापूर्वीच विजयाचा गुलाल उधळण्याचा विश्वास व्यक्त केला होता. त्यानंतर कार्यकर्त्यांनी सत्तार यांचे ‘किंगमेकर’ असे उल्लेख असलेले पोस्टर झळकावत आनंदोत्सवाला सुरुवात केली. शरदचंद्र पवार पक्षासह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विशेष म्हणजे, महायुतीत असलेल्या अब्दुल सत्तार यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. त्यामुळे प्रतापसिंह पाटील यांच्या विजयात अब्दुल सत्तार यांची भूमिका महत्त्वाची ठरल्याची प्रतिक्रिया समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे.








