पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांची मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या हर्षदा जाधव-देशमुख यांनी भाजपच्या स्मिता जाधव यांच्यावर आघाडी घेतली होती. शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे यांनी पहिल्या फेरीअखेर शिंदे सेना पुरस्कृत उमेदवार सचिन सानप यांच्यावर ६ हजार ७०० मतांची आघाडी घेतली होती.
विजयासाठी १ लाख १३ हजार ११३ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला
पदवीधर मतदारसंघात जाधव-देशमुख यांनी पहिल्या पसंतीच्या मतांमध्येच विजयासाठी आवश्यक कोटा पूर्ण केल्याचे सांगितले जात होतं. मात्र, रात्री उशिरापर्यंत याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती. पदवीधर मतदारसंघात ३ लाख ८८ हजार १९ नोंदणीकृत मतदारांपैकी २ लाख ४३ हजार ५२१ मतदारांनी मतदान केले होते. या मतदारसंघात ६२.७६ टक्के मतदानाची नोंद झाली. पडलेल्या मतांपैकी १७ हजार २९९ मते अवैध ठरली असून, विजयासाठी १ लाख १३ हजार ११३ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला.
(२७ ऑक्टोबर)रात्री १२ पर्यंत हाती आलेल्या वृत्तानुसार
शिक्षक मतदारसंघात मंगळवार (२७ ऑक्टोबर)रात्री १२ पर्यंत हाती आलेल्या वृत्तानुसार, भाजपचे कौस्तुभ गावडे यांना १७ हजार ५५३ मते मिळाली. शिंदे सेना पुरस्कृत सचिन सानप यांनी ११२७७ मते मिळवत दुसरे स्थान घेतले. दत्ता सावंत यांना १०३३४, तर आसगावकर यांना ८३०० मते मिळाली. सानप आणि सावंत यांच्यात कमी मतांचा फरक असल्याने या दोन्ही उमेदवारांमध्ये चुरस आहे. गावडे आघाडीवर असले, तरी त्यांना पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये विजयासाठी आवश्यक कोटा पूर्ण करता आलेला नाही.
हर्षदा जाधव-देशमुख आघाडीवर
गावडे यांना १७५५३ मत पडली आहेत, तर सानप यांना ११२७७ मत मिऴाल्याचं पाहायला मिळालं, तर सावंत यांना १०३३४मत तर आसगावकर यांना ८३०० मत मिळाली आहेत. माञ पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या हर्षदा जाधव-देशमुख यांनी भाजपच्या स्मिता जाधव यांच्यावर आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
नियमांनुसार पुढील पसंतीची मते विचारात घेतली जाणार
दरम्यान शिक्षक मतदारसंघात ६१ हजार ९४० नोंदणीकृत मतदारांपैकी ५३ हजार १८४ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी ८५.८६ इतकी होती. पडलेल्या मतांपैकी ५१ हजार ५११ मते वैध, तर १ हजार ६७३ मते अवैध ठरली. विजयासाठी २५ हजार ७५६ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. पहिल्या पसंतीच्या मतांत कोणत्याही उमेदवाराला आवश्यक कोटा पूर्ण करता न आल्याने नियमांनुसार पुढील पसंतीची मते विचारात घेतली जाणार आहेत.








