बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर झालेल्या जीवघेण्या गोळीबार प्रकरणातील तिन्ही आरोपींना अवघ्या काही तासांत गजाआड करण्यात यश मिळालं आहे. मुंबई पोलीस आणि राजस्थानच्या कोटा शहर पोलिसांनी अत्यंत शिताफीने सापळा रचून कोटा जंक्शन रेल्वे स्थानकावरून तिन्ही हल्लेखोरांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये दोन जण हरियाणाचे रहिवासी असून एक जण मुंबईत राहणारा बिहारचा मजूर आहे.
टायगर श्रॉफवर झालेल्या जीवघेण्या गोळीबार प्रकरणातील तिन्ही आरोपींना अटक
दरम्यान, या अटकेची कारवाई सुरू असतानाच कुप्रसिद्ध लॉरेन्स बिश्नोई टोळीचा गँगस्टर अनिल पंडित याने व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप जारी करत या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. तसेच “सलमान खान माफी मागत नाही, तोपर्यंत त्याच्या जवळच्या लोकांनाही सोडणार नाही,” असा थेट इशारा दिला आहे.
थरारक नाट्य
गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर पुणे-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसने दिल्लीच्या दिशेने पळ काढत असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. मुंबई पोलिसांनी तातडीने राजस्थान पोलिसांशी संपर्क साधून तांत्रिक माहिती आणि आरोपींचा संभाव्य लोकेशन शेअर केला.
माहिती मिळताच अवघ्या १५ मिनिटांत कोटा शहर पोलिसांनी रेल्वे पोलिसांच्या (GRP) मदतीने कोटा स्थानकावर कडक बंदोबस्त तैनात केला. आरोपी गाडीतून उडी मारून पळून जाऊ नयेत म्हणून दोन्ही बाजूंच्या फलाटांवर पोलीस तैनात करण्यात आले होते. गाडी कोटा स्थानकात येताच जनरल डब्याची तपासणी करून तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. पकडण्यात आले तेव्हा त्यांच्याकडे कोणतेही शस्त्र सापडले नाही.
आरोपींची पार्श्वभूमी आणि कट काय होता?
कोटा पोलीस अधीक्षक तेजस्वीनी गौतम आणि मुंबई पोलीस उपायुक्त राजतिलक रोशन यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी रेहान मूळचा सोनिपत हरियाणा येथील रहिवासी. तो लॉरेन्स बिश्नोई टोळीचा शूटर अनिल पंडित याच्या थेट संपर्कात होता. अनिल पंडितच्या सांगण्यावरूनच त्याने टायगरवर हल्ल्याचा कट रचला. दुसरा आरोपी हृतिक कुमार ऊर्फ रोशन मूळचा बेगुसराय (बिहार) येथील रहिवासी. तो मुंबईतील अंधेरी जुहू गल्ली भागात राहून रॅपिडो बाईक चालवत होता. तर, तिसरा आरोपी सोनिपतचा रहिवासी असून मजुरी करतो वय १८ वर्षे आहे.
या तिघांनी हल्ल्यापूर्वी जुहू येथील पुष्पा पार्क परिसरात टायगरच्या हालचालींवर रेकी केली होती. गोळीबारानंतर अंधेरी स्थानकावर बाईक सोडून ते लोकलने वसईला गेले आणि तिथून जयपूर एक्स्प्रेसमध्ये बसले. जयपूरहून बसने दिल्ली आणि तेथून नेपाळमध्ये पळून जाण्याचा त्यांचा प्लॅन होता.
नेमकी घटना काय घडली होती?
काल सायंकाळी ७.४० वाजेच्या सुमारास टायगर श्रॉफ नेहमीप्रमाणे जुহूत फुटबॉल खेळून घरी परतत असताना हल्लेखोरांनी त्याच्या कारवर अगदी जवळून ७ राऊंड फायर केले. यातील ५ गोळ्या गाडीला लागल्या. सुदैवाने टायगर या हल्ल्यातून बालंबाल बचावला. मात्र, त्याचा चालक आणि तिथे उपस्थित असलेला उमेश चौहान नावाचा तरुण गोळी लागून जखमी झाला. उमेशवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. हल्लेखोरांपैकी एकाचे पिस्तुल एन मोक्यावर लॉक झाल्याने पुढील अनर्थ टळला.
“गस्टर्सना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ”, देवेंद्र फडणवीस
या घटनेवर बोलताना राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मुंबई पोलिसांनी रातोरात तपासाची चक्रे फिरवून मुख्य आरोपींची ओळख पटवली. हे लोक राज्याबाहेरून सूत्रे हलवत आहेत, त्यामुळे केंद्र सरकार आणि इतर राज्यांच्या पोलिसांच्या मदतीने या सर्वांचा पर्दाफाश केला जाईल. कोणतीही गँग असो किंवा व्यक्ती, कोणालाही सोडले जाणार नाही. धमक्या देणाऱ्यांना कसे सरळ करायचे, हे मुंबई पोलिसांना चांगले ठाऊक आहे.”
बिश्नोई गँगची धमकी अन् दाऊदवर गंभीर आरोप
दरम्यान हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणारा गँगस्टर अनिल पंडित याने एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले, “टायगर श्रॉफला आम्ही सलमान खानपासून दूर राहण्यास सांगितले होते, पण तो ऐकला नाही. जोपर्यंत सलमान खान माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही त्याचा पाठलाग सोडणार नाही. बॉलिवूड दाऊदच्या पैशावर चालते,” असा आरोपही त्याने केला. अनिल पंडित याच्यावर दिल्ली, हरियाणात अनेक गुन्हे दाखल असून जून २०२६ मध्ये गायक गुरू रंधावावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारीही त्यानेच स्वीकारली होती.
सध्या मुंबई पोलिसांचे पथक आरोपींचा ताबा घेण्यासाठी कोटा येथे रवाना झाले असून, न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून त्यांना मुंबईत आणले जाणार आहे.








