मालेगाव शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे. मालेगावच्या गजबजलेल्या राष्ट्रीय एकात्मता चौकात हिंदुस्थान पेट्रोलियमच्या टँकरने दुचाकीला चिरडलं! एका महिलेचा जागीच मृत्यू, तर एका चिमुकल्यासह दोघे मृत्यूशी झुंज देत आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दुपारी दीड वाजेच्या सुमारास हा दुर्दैवी अपघात घडला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, शहरातील अवजड वाहनांच्या वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
धडक इतकी भीषण होती की महिलेचा जागीच अंत झाला
हिंदुस्थान पेट्रोलियमच्या भरधाव टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की महिलेचा जागीच अंत झाला, तर दुचाकीवरील चिमुकला आणि एक इसम गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने मालेगाव सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
दुचाकीवरील एका बालकासह एक इसम गंभीर जखमी
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास हिंदुस्थान पेट्रोलियमच्या टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत एका महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दुचाकीवरील एका बालकासह एक इसम गंभीर जखमी झाल्याचे समजते. अपघातानंतर जखमींना तातडीने मालेगाव सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातामुळे परिसरातील वाहतुकीवर परिणाम झाला होता. स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू झाले.
मालेगावकरांचा संताप अनावर, अवजड वाहनांना बंदी असताना वाहतूक कशी?
पण या भीषण अपघातानंतर आता मालेगावकरांचा संताप अनावर झाला आहे! शहरात दिवसा अवजड वाहनांना बंदी असताना हिंदुस्थान पेट्रोलियमचा हा टँकर शहराच्या मध्यवस्तीत पोहोचलाच कसा? वाहतूक नियंत्रण यंत्रणांचं आणि प्रशासनाचं लक्ष नक्की कुठे आहे? नियमांची पायमल्ली करून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का, असा संतप्त सवाल विचारला जातोय.
दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी
यापूर्वीही मालेगावकरांनी अवजड वाहनांच्या नियमबाह्य वाहतुकीविरोधात ठिय्या आंदोलन केलं होतं. मात्र, प्रशासन अजूनही उघड्या डोळ्यांनी नागरिकांचे बळी जाताना पाहतंय का? टँकरला शहरात प्रवेशाची परवानगी होती की नाही आणि या अपघाताला जबाबदार कोण, याची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे. मालेगावच्या रस्त्यांवर नागरिकांचा जीव सुरक्षित कधी होणार? अवजड वाहनांच्या बेकायदेशीर वावरावर लगाम कधी बसणार? या प्रश्नांची उत्तरं प्रशासनाला आता द्यावीच लागतील.








