कोलकाता येथे दुर्गाोत्सवादरम्यान एक मोठी दुर्घटना घडली आहे. उत्तर कोलकात्यातील प्रसिद्ध ‘चोरबागान सार्वजनिक दुर्गापूजा’ मंडपात झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत किमान १९ भाविकांचा मृत्यू झालाय. सप्तमीच्या संध्याकाळी चोरबागान सार्वजनिक पूजा मंडपाचा काही भाग अफाट गर्दीच्या दाबाखाली कोसळला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला आणि धावपळ सुरू झाली चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये १९ जणांचा मृत्यू झाला आहे तर किमान २५ भाविक जखमी झाले आहेत.रुग्णालयातील सूत्रांनी मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली आहे.
गर्दीच्या प्रचंड दबावामुळे आणि ढाचा कमकुवत झाल्याने मंडपाचा काही भाग कोसळला
ही घटना शनिवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास घडली. मंडपाबाहेर दर्शनासाठी हजारो भाविकांची प्रचंड रांग लागली होती. त्याच वेळी अचानक मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. बाहेर उभ्या असलेल्या लोकांनी एकदम मंडपाच्या दिशेने धाव घेतली. त्यामुळे प्रचंड धक्काबुक्की सुरू झाली. तसेच अचानक झालेल्या गर्दीच्या प्रचंड दबावामुळे आणि ढाचा कमकुवत झाल्याने मंडपाचा काही भाग कोसळल्याचंही म्हटलं जातं.या सगळ्या गोंधळात काही भाविक निसरड्या रस्त्यावर तोल जाऊन खाली पडले आणि त्यांच्या अंगावरून जमाव पुढे निघून गेला. त्यामुळे भीषण चेंगराचेंगरी निर्माण झाली.
गुदमरल्याने अनेकांना त्रास
घटनेनंतर तत्काळ मदत आणि बचावकार्य हाती घेण्यात आले. बाउबाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोलकाता मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये किमान २५ गंभीर जखमींना दाखल करण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनुसार, अनेक रुग्णांना श्वास घेण्यास अडचण येत असून गुदमरल्यासारखे वाटत होते. त्यामुळे काहींचा उपचारादरम्यान प्राण गमावल्याचे सांगण्यात येत आहे.
जखमींना रुग्णवाहिकांच्या साहाय्याने रुग्णालयात हलवण्यातही आले
घटनेची माहिती मिळताच कोलकाता पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन पथकाचे जवान तैनात करण्यात आले होते. बचाव पथकांनी तातडीने परिसर रिकामा करत जखमींना रुग्णवाहिकांच्या साहाय्याने रुग्णालयात हलवण्यातही आले आहे. दरम्यान, पोलिस प्रशासनाने सुरक्षेचे योग्य नियोजन न केल्यामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप काही प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.
VIDEO | Kolkata: Visuals from the incident spot. At least 17 people died and 25 others were injured in a stampede-like situation at a Durga Puja pandal in north Kolkata on Saturday evening.
As it started raining, people waiting outside the Chorbagan Durga Puja pandal rushed forward, and some fell on the road, leading to the stampede.
#Kolkata #DurgaPuja #Stampede
— Press Trust of India (@PTI_News) October 17, 2026
सुरुवातीला 17 जणांचा मृत्यू झाला, तर त्यापाठोपाठ आणखी 2 जणांचा मृत्यू झाला
या भीषण घटनेनंतर पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुवेंदू अधिकारी आणि आरोग्य मंत्री सरद्वत मुखर्जी यांनी तातडीने कोलकाता मेडिकल कॉलेजला भेट देऊन जखमींची विचारपूस केली आणि डॉक्टरांना उपचाराच्या सर्व सुविधा पुरवण्याचे आदेश दिले.तसेच मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी घटनेबाबत सांगितलं, “सुरुवातीला 17 जणांचा मृत्यू झाला, तर त्यापाठोपाठ आणखी 2 जणांचा मृत्यू झाला. या घटनेतील 24 जणांवर उपचार सुरू असून सद्यस्थितीत एका जणाची प्रकृती थोडी गंभीर आहे. आम्ही आमचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. गृहमंत्री अमित शाह यांचा कार्यक्रमदेखील रद्द करण्यात आला आहे.”
मृतांच्या प्रत्येक कुटुंबाला 25 लाख रुपयांची भरपाई
कोलकात्याहून प्रतिनिधी प्रभाकर मणि तिवारी यांनी सांगितलं की, सुवेंदू अधिकारी यांनी घटनेतील मृतांच्या प्रत्येक कुटुंबाला 25 लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा केली आहे.तसेच, प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याचंही म्हटलं आहे. तर, घटनेतील जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करणार असून त्यांनाही प्रति व्यक्ती 5 लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार असल्यांचं म्हटलं आहे.
या घटनेतील मृतांमध्ये महिला आणि मुलांची संख्या जास्त आहे. या प्रकरणाची चौकशी कोलकाता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत केली जाणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.कोलकाता पोलिसांचं एएफएस पथक सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे. या प्रकरणात जो कोणी निष्काळजीपणासाठी दोषी आढळेल त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असंही सांगण्यात आलं आहे.








