
मागील काही महिन्यांपासून राज्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून जोरदार कारवाई सुरू आहे. दिवाळी आणि सणांच्या पार्श्वभूमिवर तर FDA नं कारवाईचा धडका जास्तच संख्येन वाढवला आहे. एफडीएच्या कारवाईने भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. एफडीएने आता पुन्हा मोठी कारवाई केली आहे.
श्री क्षेत्र अक्कलकोट येथे FDA ची धाड
आता महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध देवस्थान श्री क्षेत्र अक्कलकोट येथे FDA ने धाड टाकली. स्वामी समर्थ मंदिर परिसरात प्रसादासाठी विकल्या जाणाऱ्या मिठाईच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी मोठी कारवाई अन्न आणि औषध प्रशासनाने केली आहे.
तब्बल २ लाख ५० हजार रुपये किंमतीचा साडेआठशे किलो मिठाईचा साठा जप्त
सोलापूर येथील अन्न व औषध प्रशासनाच्या झोन-१ पथकाने अक्कलकोटमधील पेढा उत्पादक आणि विक्रेत्यांवर धडक कारवाई करत तब्बल २ लाख ५० हजार रुपये किंमतीचा साडेआठशे किलो मिठाईचा साठा जप्त केला आहे. स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक अक्कलकोटमध्ये येत असतात. या भाविकांकडून प्रसादासाठी मोठ्या प्रमाणावर कंदी पेढे आणि हलवा खरेदी केला जातो. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मंदिर परिसरातील १२ पेढा आणि प्रसाद विक्री करणाऱ्या दुकानांची कसून तपासणी केली.
मुख्य पुरवठादार असलेल्या व्यावसायिकाचा अन्न परवाना निलंबित
या मोहिमेअंतर्गत अक्कलकोट येथील मुख्य मिठाई पुरवठादार असलेल्या ‘रंगोली स्वीट मार्ट’वर पथकाने छापा टाकला. तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन आणि अन्न सुरक्षा मानकांची पूर्तता न केल्याचे निदर्शनास आल्याने प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. या कारवाईत कंदी पेढे आणि हलव्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला असून, गंभीर त्रुटी आढळलेल्या चार आस्थापनांना तात्काळ व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच,एफडीएने केलेल्या या कारवाईमुळे मुख्य पुरवठादार असलेल्या व्यावसायिकाचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला आहे. त्यासोबतच चार आस्थापनांना व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अक्कलकोटमधील मिठाई उत्पादक आणि विक्रेत्यांचे धाबे दणाणले
अन्न व औषध प्रशासनाच्या या धडक मोहिमेमुळे अक्कलकोटमधील मिठाई उत्पादक आणि विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. भाविकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.








