
पुण्यातील शिवाजीनगर सत्र न्यायालयाच्या आवारात काल (२६ नोव्हेंबर २०२६ ) दुपारी सव्वा एकच्या सुमारास घडलेल्या गोळीबार आणि कोयता हल्ल्याच्या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. या हल्ल्यात ३५ वर्षीय मंदार किवळेवर गोळीबार करण्यात आला एवढंच नाही तर त्याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. यात तो गंभीर जखमी झाला होता.त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखलही करण्यात आलं होतं माञ तेव्हाच त्याचा मृत्यू झाला.
मंदार हा शुभम चव्हाण हत्येतील आरोपी होता.
आता या प्रकरणामागील धक्कादायक कारण समोर आले आहे. मंदार हा शुभम चव्हाण हत्येतील आरोपी होता. २०२५ मध्ये कात्रज येथे झालेल्या शुभम चव्हाण या तरुणाच्या हत्येचा बदला घेण्यासाठीच शुभमच्या भावाने आणि त्याच्या मित्रांनी हा जीवघेणा कट रचल्याची माहिती समोर आली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
पुण्याच्या कात्रज भागात शुभम चव्हाण या तरुणाची 2025 साली हत्या करण्यात आली होती. मालमत्तेच्या वादातून त्याची हत्या झाली होती. लाकडी ओंडके आणि बांबूच्या काठ्यांनी मारहाण करून चव्हाणची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी चार जणांना अटक केली होती. शुभम चव्हाण हा संतोष नगर येथील रहिवासी होता. या भागात रेस्टॉरंट देखील होता. घराशेजारील जमिनीवरून शुभम चव्हाण आणि अमर सोकोरेचा वाद सुरू होता. त्यातून चौघांनी मिळून चव्हाणला मारहाण करून संपवलं. चव्हाणला संपवल्यानंतर आरोपी पळून गेले होते. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात कामती येथून आरोपींना ताब्यात घेतलं होतं. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली होती.
शुभमच्या हत्येचा बदला घेणार असल्याचा निर्धार
शुभमचा भाऊ आणि त्याच्या मित्राने शपथ घेतली होती. शुभमच्या हत्येचा बदला घेणार असल्याचा निर्धार त्यांनी घेतला होता. त्यानंतर या प्रकरणात आरोपी मंदार केवळे तुरुंगातून बाहेर आला. त्यानंतर दोन दिवसातच ६ जणांच्या टोळक्यांनी जीवघेणा हल्ला केला.
शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 9 आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल
दरम्यान, मंदार किवळे हल्ला प्रकरणातील सहा आरोपींची ससून रुग्णालयात मेडिकल पूर्ण झाली आहे. पहाटे 5 च्या दरम्यान या सहा आरोपीची वैद्यकीय तपासणी पूर्ण केली आहे. आज गुरुवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास या आरोपींना शिवाजीनगर न्यायालयात न्यायाधीशांसमोर हजर करणार आहेत. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 9 आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.








