
संयुक्त राष्ट्र महासभेने घोषित केलेल्या ‘बालविवाह व सक्तीचे विवाह निर्मूलन आंतरराष्ट्रीय दिनाचे’ औचित्य साधून आणि केंद्र शासनाच्या ‘बालविवाह मुक्त भारत’ अभियानांतर्गत मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात सामूहिक बालविवाह प्रतिबंध शपथ आणि स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. भरुचा हॉल, पोलीस आयुक्त आवार येथे हा उपक्रम उत्साहात पार पडला.
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग व ‘होप फॉर दी चिल्ड्रेन फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बालस्नेही महाराष्ट्र अभियान’ क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेदरम्यान जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाईल्ड हेल्पलाईन यांच्या वतीने ही जनजागृती मोहीम राबविण्यात आली.
वरिष्ठ पोलीस अधिकारी व मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
या कार्यक्रमप्रसंगी महिला अत्याचार प्रतिबंधक कक्षाच्या पोलीस उप आयुक्त श्रीमती शीला साईल, विशेष बाल पोलीस कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नितीन फणदार, महिला अत्याचार प्रतिबंधक शाखेच्या पोलीस निरीक्षक श्रीमती वैशाली सरवदे, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे माजी सदस्य ॲड. संजय सेंगर उपस्थित होते. तसेच ‘होप फॉर दी चिल्ड्रेन फाउंडेशन’च्या संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. केलीलोना, मुख्य संचालन अधिकारी श्री. शकील शेख, प्रोग्रॅम मॅनेजर ॲड. परम आनंद, मॅनेजर श्री. सचिन करजुले आणि असिस्टंट मॅनेजर श्री. वसिम शेख यांनीही सहभाग नोंदवला.
पोलीस अधिकाऱ्यांचा ‘बालविवाह मुक्त महाराष्ट्रा’चा संकल्प
या एकदिवसीय कार्यशाळेत मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांचे बाल कल्याण पोलीस अधिकारी, बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळ सदस्य, जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाईल्ड हेल्पलाईनचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी सर्व मान्यवर आणि पोलीस अधिकाऱ्यांनी “महाराष्ट्र राज्य बालविवाह मुक्त करण्याचा” संकल्प करत सामूहिक शपथ घेतली आणि स्वाक्षरी फलकावर स्वाक्षऱ्या करून मोहिमेला आपला पाठिंबा दर्शविला.
चाईल्ड हेल्पलाईन १०९८ आणि कायद्याबाबत जनजागृती
कार्यक्रमाच्या ठिकाणी चोवीस तास मोफत आपत्कालीन सेवा देणाऱ्या ‘चाईल्ड हेल्पलाईन १०९८’ ची कार्यपद्धती आणि ‘बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६’ बाबत माहिती देणारे फलक प्रदर्शित करून जनजागृती करण्यात आली. समाजात कोठेही बालविवाह होत असल्यास किंवा संकटात सापडलेले बालक आढळल्यास नागरिकांनी कोणताही विलंब न करता तात्काळ चाईल्ड हेल्पलाईन १०९८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड हेल्पलाईन, मुंबई शहर यांच्या वतीने करण्यात आले आहे.








