हिंगोली पुन्हा हादरले! ११:२६ वाजता भूकंपाचे धक्के;
हिंगोली जिल्ह्याला आज पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का बसला आहे. आज, ११ जुलै रोजी सकाळी सुमारे ११ वाजून २६ मिनिटांनी जिल्ह्यात भूकंपाचे हादरे जाणवले.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू औंढा नागनाथ तालुक्यातील वसई परिसरात असून, भूकंपाची खोली ५ किलोमीटर इतकी नोंदवण्यात आली आहे.
हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे गेल्या आठ वर्षांपासून अधूनमधून भूकंपाचे धक्के बसत असल्याने ग्रामस्थांमध्ये चिंता वाढली आहे.
यापूर्वी ८ जुलैच्या मध्यरात्री जिल्ह्यात सलग चार भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्या भूकंपांचे केंद्रबिंदू पांगरा शिंदे आणि औंढा नागनाथ तालुक्यातील काकडधाबा परिसरात होते. त्याच दिवशी मागील काही वर्षांतील सर्वात मोठा ४.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप नोंदवण्यात आला होता.
सध्या तरी या ताज्या भूकंपात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अशाच वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत राहा जागृत महाराष्ट्र न्यूज.








