जवळजवळ प्रत्येक घरात फ्रिजचा वापर केला जातो. भाज्या, पीठ आणि दूध यांसारखे उरलेले अन्नपदार्थ लवकर खराब होऊ नयेत म्हणून लोक ते फ्रिजमध्ये ठेवतात. पण हे खरोखरंच आरोग्यदायी आहे का? कारण एका तपासात असं समोर आलं आहे की, ९०% लोक रेफ्रिजरेटरमध्ये अन्न चुकीच्या पद्धतीने ठेवतात, ज्यामुळे अन्नातून विषबाधा आणि आजारपणाचा धोका वाढतो. हे ऐकायला विचित्र वाटेल पण हे खरं आहे. फ्रिजमध्ये जर अन्नपदार्थ चुकीच्या पद्धतीने साठवले तर विषबाधा होऊ शकते. रेफ्रिजरेटरमध्ये अन्न ठेवताना तुम्हीही या पाच चुका करता का?

फ्रिजमध्ये अन्न ठेवताना या ५ चुका टाळा

उरलेले अन्न वरच्या कप्प्यात ठेवा

उरलेले अन्न, जसे की डाळ, भाज्या किंवा भात, रेफ्रिजरेटरच्या वरच्या कप्प्यात ठेवावे. तसेच, खाण्यासाठी तयार असलेले कोणतेही खाद्यपदार्थ वरच्या कप्प्यात ठेवावेत. मात्र, हे लक्षात ठेवा की अन्न हवाबंद डब्यांमध्ये ठेवावे. यामुळे ते जास्त काळ ताजे राहील.

दुग्धजन्य पदार्थ मधल्या कप्प्यात ठेवा

दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, जसे की दही, पनीर, चीज किंवा ताक, नेहमी रेफ्रिजरेटरच्या मधल्या कप्प्यात ठेवावेत. बरेच लोक दूध दाराच्या कप्प्यात ठेवण्याची चूक करतात, परंतु यामुळे दूध लवकर खराब होण्याची शक्यता वाढते.

मांसाहारी पदार्थ खालच्या कप्प्यात ठेवा

डॉ. शालिनी यांच्या मते, मांस, मासे आणि चिकन यांसारखे मांसाहारी पदार्थ नेहमी रेफ्रिजरेटरच्या खालच्या कप्प्यात ठेवावेत. कारण जर या पदार्थांमधील द्रव इतर खाद्यपदार्थांवर सांडला, तर त्यामुळे जिवाणू पसरू शकतात आणि अन्न विषबाधेचा धोका वाढू शकतो. तसेच, मांसाहारी पदार्थ नेहमी हवाबंद डब्यांमध्ये ठेवावेत.

भाज्या फक्त भाजीच्या ड्रॉवरमध्येच ठेवा

ताज्या भाज्या आणि फळे नेहमी भाजीच्या कप्प्यात ठेवावीत. रेफ्रिजरेटरमधील हा भाग फळे आणि भाज्यांचा ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठीच असतो, जिथे आर्द्रतेचे प्रमाण संतुलित राहते. यामुळे भाज्या जास्त काळ ताज्या राहतात आणि त्यातील पोषक तत्वे टिकून राहतात.

सॉस आणि पेये रेफ्रिजरेटरच्या दारात ठेवा

सॉस, जॅम, ज्यूस, शीतपेये आणि इतर पेये रेफ्रिजरेटरच्या दाराजवळील कप्प्यात ठेवणे उत्तम असते. दार वारंवार उघडले जात असल्यामुळे रेफ्रिजरेटरच्या या भागातील तापमान सतत बदलत राहते, त्यामुळे दूध, अंडी आणि दही यांसारखे खाद्यपदार्थ लवकर खराब होण्याची शक्यता जास्त असते.