नवी मुंबईहून श्रीनगरला पोहोचलेल्या इंडिगोच्या विमानाचा श्रीनगर विमानतळावनर अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी सकाळी 9 वाजता विमान पार्किंग क्षेत्रात हा अपघात घडल्याचं समोर आलं आहे. प्रवासी आणि कॅबिन क्रू सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.
नवी मुंबईहून श्रीनगरला गेलेल्या इंडिगो विमानाचा अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईहून श्रीनगरला आलेले इंडिगोचे विमान पार्किंगसाठी क्रमांक 6 वर नेण्यात येत होते. याचवेळी विमानाची VDGS च्या खांबाला धडक झाली. ही घटना सकाळी सुमारे 9 वाजून 2 मिनिटांनी घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. घटनेच्या वेळी विमानात मोठ्या संख्येने प्रवासी होते. मात्र, विमान खांबाला धडकल्यानंतरही कोणालाही दुखापत झाली नाही. सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
सर्व प्रवासी आणि विमान कर्मचारी सुरक्षित आहेत
विमान क्रमांक 6E 225, VT-NOG चा अपघात घडला. सर्व प्रवासी आणि विमान कर्मचारी सुरक्षित आहेत. कुणालाही दुखापत झाली नाही. नवी मुंबईहून हे विमान श्रीनगरला पोहोचले होते. त्याचवेळी पार्किंग क्षेत्रात हा अपघात घडला.या घटनेनंतर श्रीनगर विमानतळावरील इतर सर्व विमान सेवा आणि उड्डाणे सुरळीतपणे सुरू आहेत. त्यांच्या उड्डाणावर आणि इतर प्रक्रियेवर कोणताही परिणाम झालेला नाही. या अपघाताची आता चौकशी करण्यात येत आहे.
विमान पार्किंग करताना चूक?
दरम्यान, विमान पार्किंग करताना नेमकी चूक कुठे झाली, याचा तपास सुरू करण्यात आला आहे. विमानतळ प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, तपास पूर्ण झाल्यानंतरच या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होईल. त्यामुळे सध्या कोणत्याही संभाव्य कारणावर अंतिम निष्कर्ष काढता येणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
इंडिगोच्या आणखी एका विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
दोहा येथून बेंगळुरूकडे जाणारे इंडिगोचे 6E 1302 हे विमान पायलट आजारी पडल्यामुळे गुरुवारी मस्कतच्या दिशेने वळवण्यात आले होते. हे विमान ए321 प्रकारचे होते. विमान कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, अचानक वैद्यकीय मदतीची गरज भासल्याने विमान मस्कत येथे उतरवण्यात आले. विमान उतरल्यानंतर संबंधित सदस्यावर वैद्यकीय पथकाने उपचार केले असून त्यांची प्रकृती आता सुधारली आहे. प्रवाशांना बेंगळुरूला पोहोचवण्यासाठी पर्यायी विमान आणि नव्या क्रूची व्यवस्था करण्यात आली.









