मुंबई-गोवा महामार्गावरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आहे नागोठाणे उड्डाणपुलाबाबतचा. या पूलाला भेगा पडल्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.याच नागोठाणे उड्डाणपुलाबाबत एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.गणेशोत्सवाच्या काळात हा पूल छोट्या वाहनांसाठी सुरू करण्याच्या हालचाली सुरू असतानाच समोर आलेल्या या व्हिडीओमुळे पुलाच्या दुरुस्तीच्या कामाबाबत आणि सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
उड्डाणपुलाच्या सिमेंट प्लेट्सवर काचेच्या पट्ट्या,एम-सील, व्हायरल व्हिडीओमागचं खरं सत्य
नागोठाणे उड्डाणपुलाच्या सिमेंट प्लेट्सवर काचेच्या पट्ट्या आणि एम-सील लावलेला व्हिडीओ व्हायरल होण्यामागचे कारण म्हणजे पुलाला पडलेल्या भेगांवर नजर ठेवण्यासाठी वापरण्यात आलेली ‘ग्लास टेल-टेल’ ही तांत्रिक पद्धत आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अनेकांनी असा गैरसमज करून घेतला की ठेकेदाराने पुलाला आधार देण्यासाठी किंवा पूल कोसळण्यापासून वाचवण्यासाठी अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करून केवळ काचा आणि एम-सील लावले आहे. मात्र, यामागचे खरे तांत्रिक कारण आता समोर आले आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीसाठी पूल सुरू करण्याच्या दृष्टीने सूचना
काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी नागोठाणे उड्डाणपुलाची पाहणी केली होती.त्यानंतर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीसाठी पूल सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक सूचना देण्यात आल्या. मात्र, पूल सुरू होण्यापूर्वीच त्या पूलाच्या भिंतींवरील सिमेंटच्या प्लेट्सना काचेच्या पट्ट्या लावल्याचा व्हिडीओ समोर आला. दरम्यान हा हा व्हिडीओ यश शेळके या तरुणाने शूट करून सोशल मीडियावर शेअर केल्याचं सांगितलं जात आहे.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये पुलाच्या मजबुतीबाबत चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, या काचेच्या पट्ट्यांचा नेमका वापर कशासाठी करण्यात आला आहे, याबाबत प्रशासन किंवा संबंधित ठेकेदाराकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेलं नाही.
View this post on Instagram
‘Glass Tell-Tale’ पद्धतीने भेगांवर नजर
उड्डाणपुलावर दिसणाऱ्या काचेच्या पट्ट्यांचा संबंध ‘Glass Tell-Tale’ या पद्धतीशी असल्याचं दिसून येतं. बांधकामातील भेगा वाढत आहेत का किंवा त्या ठिकाणी हालचाल होत आहे का, हे तपासण्यासाठी ही साधी पद्धत वापरली जाते. यामध्ये भेगेच्या दोन्ही बाजूंना काचेची पातळ पट्टी मजबूत डिंक किंवा सिमेंटच्या साहाय्याने बसवली जाते. बांधकामाच्या संरचनेत हालचाल झाली आणि भेग रुंदावली,किंवा पूलाच्या भिंतींना तडे जात असतील तर ती काच तेव्हा तुटते असं म्हटलं जात आहे. त्यामुळे संबंधित ठिकाणी हालचाल झाल्याचं लक्षात येऊ शकतं. मात्र, ही पद्धत संपूर्ण संरचनात्मक सुरक्षिततेचा पर्याय नसून निरीक्षणासाठी वापरली जाणारी प्राथमिक पद्धत आहे.
काचेच्या पट्ट्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संभ्रम
गणेशोत्सवाच्या काळात कोकणात मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढते. त्यामुळे नागोठाणे उड्डाणपूल सुरू झाल्यास मुंबई-गोवा मार्गावरील वाहतुकीला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, पूल वाहतुकीसाठी खुला करण्यापूर्वी त्याची सखोल तांत्रिक आणि संरचनात्मक तपासणी करण्याची मागणी होत आहे. काचेच्या पट्ट्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यापूर्वी त्याची संपूर्ण तांत्रिक आणि संरचनात्मक तपासणी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जातेय








