मालाड पश्चिम येथील मढ आयलँड, शिवाजी नगर परिसरात स्वस्त दरात घरे देण्याचे आमिष दाखवून तब्बल ६० महिलांची २ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील आरोपी अविनाश देवराम भानजी आणि त्याचा भाऊ प्रमोद देवराम भानजी यांच्याविरोधात ‘महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध संरक्षण’ कायद्यांतर्गत मालमत्ता जप्तीचे अधिकृत शासन आदेश जारी करण्यात आले आहेत. या धडक कारवाईमुळे वर्षानुवर्षे न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या कष्टकरी महिलांना आपले हक्काचे पैसे परत मिळण्याची मोठी आशा निर्माण झाली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
आरोपी अविनाश भानजी आणि प्रमोद भानजी यांनी स्वतःला विकासक म्हणजे डेव्हलपर असल्याचे भासवून मढ आयलँड परिसरात १०० हून अधिक घरांची निर्मिती करत असल्याचा दावा केला होता. घरकाम करून कुटुंब चालवणाऱ्या गरीब व मध्यमवर्गीय महिलांना जाळ्यात ओढून प्रत्येक महिलेकडून सुमारे ४ लाख रुपयांची गुंतवणूक करून घेण्यात आली. मात्र, दोन वर्षे उलटूनही प्रत्यक्ष बांधकामात कोणतीही प्रगती झाली नाही. जेव्हा महिलांनी आपले पैसे किंवा घरांची मागणी केली, तेव्हा आरोपींनी देण्यास स्पष्ट नकार दिला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितांनी मालवणी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवण्यात आली आहे.
लोकप्रतिनिधी व समाजसेवकांचा पाठपुरावा
या गंभीर प्रकरणाची दखल घेत स्थानिक आमदार असलम शेख यांनी संबंधित पोलीस उपायुक्तांना तातडीने आणि निष्पक्ष चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. त्याचबरोबर समाजसेवक संजय सुतार यांनी मालवणी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सतत पाठपुरावा ठेवून पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला.
कायदेशीर लढा आणि शासकीय राजपत्र
न्यायालयात पीडित महिलांच्या बाजूने ॲड. नेहा एम. पाटील, ॲड. गणेश चव्हाण आणि ॲड. सुभाष पगारे यांनी भक्कम युक्तिवाद केला. आरोपींवर MPID कायद्यांतर्गत कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी लावून धरली. न्यायालयाचे निर्देश आणि पोलीस तपासाच्या आधारे गृह विभागाने २५ ऑगस्ट २०२६ रोजी आदेश जारी करून आरोपी अविनाश भानजी याची अंधेरी-वर्सोवा येथील स्थावर मालमत्ता तसेच विविध बँक खाती जप्त करण्याचे आदेश दिले. २ सप्टेंबर २०२६ रोजी यासंदर्भातील अधिकृत शासकीय राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.
पीडित महिलांनकडून आभार
शासनाने मालमत्ता जप्तीचे आदेश दिल्याने आणि गॅझेट प्रसिद्ध झाल्याने फसवणूक झालेल्या महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आपल्या कष्टाची पुंजी लवकरच परत मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या संपूर्ण कायदेशीर लढ्यात मोलाचे योगदान दिल्याबद्दल सर्व पीडित महिलांनी ॲड. सुभाष पगारे ,ॲड. विक्रम कपूर आणि ‘जागृत महाराष्ट्र न्यूज’चे संपादक अमोल भालेराव यांचे विशेष आभार मानले आहेत.








