बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यूबाबत सीबीआय चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. तसेच, या प्रकरणी एफआयआर दाखल करण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले होते माञ आता न्यायालयाच्या आदेशानुसार, सीबीआयनं याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. CBIने या प्रकरणात औपचारिकरित्या FIR दाखल केला असून, त्यात हत्या आणि सामूहिक बलात्कारासह विविध गंभीर कलमे लावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या FIRमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक व्यक्तींची नावे नमूद करण्यात आली आहेत.
सहा वर्षांनंतर प्रकरणाला नवे वळण
दिशा सालियान यांच्या मृत्यूला जवळपास सहा वर्षे उलटल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला आता नवे वळण मिळालं आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने हा गुन्हा नोंदवला आहे. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी दिलेल्या ७ पानाच्या सविस्तर जबाबाच्या आधारे हा तपास सुरू करण्यात आला आहे. बॉम्बे हायकोर्टाने याच महिन्यात दिशा सालियान प्रकरणाचा तपास CBIकडे सोपवण्याचे निर्देश दिले होते. तसेच इतकी वर्षे FIR दाखल न करता केवळ ‘Accidental Death Report’ च्या माध्यमातून प्रकरण हाताळल्याबद्दल मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही न्यायालयाने गंभीर प्रश्न उपस्थित केले होते.न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर CBIने तपासाची औपचारिक सुरुवात करत FIR दाखल केल्याचे समोर आले आहे.
उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप, तर अनिल देशमुखांचाही समावेश
FIRमध्ये उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरे यांच्याव्यतिरिक्त रोहन रॉय, डिनो मोरिया, सूरज पंचोली, रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, सचिन वाझे, परमबीर सिंह, अनिल देशमुख यांच्यासह अनेक पोलिस अधिकारी आणि इतर व्यक्तींची नावे नमूद असल्याचे वृत्त आहे.यांचीही चौकशी केली जाणार आहे. CBI कडून एफआयआरची कॉपी हायकोर्टाला दिली जाणार आहे.
चिमाजी आढाव आणि इतर अधिकाऱ्यांचा समावेश
एवढंच नाही तर, दिशा सालियन मृत्यू प्रकरणात तत्कालीन मालवणी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांचे नाव सीबीआयने नोंदवलेल्या FIR आले आहे. दिशा सालियन हिच्या मृत्यूनंतर सुरुवातीला मुंबई पोलिसांच्या मालवणी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली होती. या सुरुवातीच्या तपासात आणि पुरावे लपवण्यात किंवा निष्काळजीपणा करण्यात तसेच तपासात विसंगती ठेवल्याचा आणि खोटे रेकॉर्ड तयार केल्याचा संशय तत्कालीन पीआय चिमाजी आढाव यांच्यासह काही पोलीस अधिकाऱ्यांवर करण्यात आल्याने त्यांचीही नावे जबाबात व एफआयआरमध्ये आली आहेत.
तसेच दिशा राहत असलेल्या इमारतीतील सुरक्षा कर्मचारी, काही सरकारी अधिकारी, फॉरेन्सिक प्रयोगशाळेतील संबंधित अधिकारी, पोस्टमॉर्टमशी संबंधित डॉक्टर आणि कर्मचारी तसेच यापूर्वीच्या तपासावर देखरेख ठेवणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी FIRमध्ये करण्यात आली आहे. दिशाच्या मृत्यूचा आधीचा घटनाक्रम खोटा असल्याचे आणि मूळ पुरावे दडपून खोटे रेकॉर्ड तयार करण्यात आल्याचा आरोप वडिलांच्या जबाबत करण्यात आला आहे.
FIRमध्ये असलेले गंभीर आरोप
समोर आलेल्या FIRच्या माहितीनुसार,सीबीआयने या प्रकरणात सामूहिक बलात्कार (गँगरेप), हत्या आणि गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपांखाली गुन्हा नोंदवला आहे. यांसोबत
दिशा सालियान यांच्या मृत्यूमागे कटकारस्थान रचणे, त्यानंतर आत्महत्येची खोटी कहाणी तयार करणे,सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्याच्या आरोपांच्या अनुषंगाने म्हणजे संबंधित सरकारी कर्मचारी आणि पोलिस अधिकाऱ्यांनी कागदपत्रे अथवा सरकारी नोंदींमध्ये फेरफार केला का, पुरावे दडपले का किंवा आरोपींना वाचवण्यासाठी यंत्रणेचा गैरवापर झाला का, याचाही तपास केला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
8 जून 2020 रोजी झाला होता मृत्यू
दिशा सालियान यांचा 8 जून 2020 रोजी मुंबईतील मालाड परिसरातील एका बहुमजली इमारतीच्या 12व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर अवघ्या सहा दिवसांनी, 14 जून 2020 रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांचा त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी मृत्यू झाला.या दोन्ही घटनांमध्ये काही संबंध असल्याचे दावे आणि आरोप त्यानंतर सातत्याने केले गेले. मात्र आता सुरु असलेल्या तपासातून बऱ्याच गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे.








