मुंबईत दर रविवारी उपगनरीय रेल्वे मार्गावर काही तासांसाठी ब्लॉक घेतला जातो. रुळ, सिग्नल दुरुस्ती तसच अन्य कामांसाठी हा ब्लॉक असतो. ब्लॉकच्या काळात काही नियमित धावणाऱ्या लोकल रद्द केल्या जातात किंवा काही लोकल सेवा उशिराने सुरु असतात. पण आता मुंबईत गणेशोत्सव सुरु असल्यानं जर रविवारी मेगा ब्लॉक घेतला तर नक्कीच भाविकांची, मुंबईकरांची नक्कीच तारांबळ उडेल.
मध्य आणि पश्चिम रेल्वेने घेतला रविवारीच्या नियमित मेगा ब्लॉकबाबत महत्त्वाचा निर्णय
लाखो भाविक गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येत आहेत. रविवारी तर भाविकांची गर्दी वाढेल. लालबागचा राजा, जीएसबी तसच अन्य प्रसिद्ध गणेश मंडळांच्या मंडपात दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळणार. म्हणूनच उद्या २० सप्टेंबर २०२६ रोजी मध्य आणि पश्चिम रेल्वेने रविवारी नियमित मेगा ब्लॉक न घेण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवासाठी नियमित ब्लॉक उद्या रविवारचा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे.
20 सप्टेंबर रविवारी मेगा ब्लॉक कसा असणार?
लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रविवारी (20 सप्टेंबर) मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. हा ब्लॉक केवळ ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यानच्या 5 व्या आणि 6 व्या मार्गावर घेण्यात येणार आहे. या विशेष ब्लॉकची वेळ रविवारी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली असून, या कालावधीत संबंधित रेल्वे रुळांच्या देखभाल आणि दुरुस्तीचे आवश्यक काम पूर्ण केले जाईल.
रविवारी मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडण्याची शक्यता
सार्वजनिक मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी रविवारी मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊनच रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. फक्त मध्य रेल्वेच्या ठाणे-कल्याण दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गावर सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत देखभाल कामांसाठी विशेष ब्लॉक असणार आहे. मुख्य, हार्बर, ट्रान्स-हार्बर आणि बेलापूर-उरण पोर्ट मार्गावरील लोकल सेवा दिवसा सुरळीत राहील. ठाणे-कल्याणदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गावरील कामांमुळे काही मेल-एक्स्प्रेस जलद मार्गावरून वळवण्यात येतील. त्यामुळे लोकल सेवा 10 ते 15 मिनिटांचा विलंब होण्याची शक्यता आहे.
मेल आणि एक्सप्रेस गाड्यांवरही या मेगा ब्लॉकचा परिणाम होणार
याचप्रमाणे, ‘अप’ दिशेने मुंबईकडे येणाऱ्या मेल आणि एक्सप्रेस गाड्यांवरही या मेगा ब्लॉकचा परिणाम दिसून येणार आहे. ‘अप’ दिशेच्या काही मेल आणि एक्सप्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान ‘अप’ जलद मार्गावरून वळवण्यात येतील. परिणामी, ब्लॉक कालावधीत प्रवास करणाऱ्या या गाड्या पोहोचण्यासाठी 10 ते 15 मिनिटे उशीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या बदलाची नोंद घेऊन त्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
या लाईन्सवर रविवारी कोणताही ब्लॉक नसणार
लोकलने प्रवास करणाऱ्या सामान्य मुंबईकरांसाठी मात्र रविवारी मोठी दिलासादायक बाबही असणार आहे. मेन लाईनवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण विभाग आणि हार्बर लाईनवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल या मार्गांवर कोणताही ‘मेगा ब्लॉक’ घेतला जाणार नाही. याशिवाय, ट्रान्स-हार्बर लाईन आणि बेलापूर-उरण पोर्ट लाईनवरही रविवारी कोणताही ब्लॉक नसेल. त्यामुळे या सर्व मार्गांवरील लोकल वाहतूक रविवारी नेहमीप्रमाणे पूर्णपणे सुरळीत सुरु राहील.
अनंत चतुर्दशीसाठी पश्चिम रेल्वेवर विशेष गाड्या
अनंत चतुर्दशीच्या दिवशी होणाऱ्या गणेश विसर्जनादरम्यान लाखो गणेशभक्तांची होणारी गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने विशेष वाहतुकीचे नियोजन केले आहे. विसर्जनाच्या रात्री चर्चगेट विरार मार्गावर 12 विशेष उपनगरीय लोकल चालविण्यात येणार असून, चर्नी रोड स्थानकावरील लोकलच्या थांब्यांमध्येही तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. विसर्जनासाठी गिरगाव चौपाटी, जुहू आणि इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होते. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मध्यरात्रीनंतर अप आणि डाऊन मार्गावर प्रत्येकी सहा अशा एकूण 12 विशेष धीम्या लोकल चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कसं असेल लोकलंच वेळापञक?
चर्चगेटहून विरारकडे रात्री १.१५ ते पहाटे ३.४५ या वेळेत, तर विरारहून चर्चगेटकडे रात्री १२.१५ ते पहाटे ३.०० या वेळेत या विशेष लोकल धावणार आहेत. चचर्गेटहून विरारसाठी रात्री १.१५, रात्री १.४५, रात्री २.१५, रात्री २.५५, रात्री ३.१५ आणि रात्री ३.४५ वाजता लोकल सुटेल. परतीच्या मार्गावर विरारहून चर्चगेटसाठी रात्री १२.१५, रात्री १२.३०, रात्री १.१०, रात्री १.३०, रात्री २ आणि रात्री ३ वाजता लोकल सुटेल.








