मुंबईच्या काळाचौकी येथील गणेशोत्सवाला गालबोट लागेल अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गणेशोत्सवाच्या उत्साहात काळाचौकी परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. प्रसिद्ध काळाचौकी महागणपती मंडळाजवळ उभारण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या तात्पुरत्या स्टॉलजवळ उभ्या असलेल्या काही लहान मुला-मुलींना मध्यरात्री अचानक विजेचा धक्का लागल्यानं मोठी खळबळ उडाली. या भीषण दुर्घटनेत 8 ते 20 वयोगटातील पाच मुले आणि किशोरवयीनांना विजेचा धक्का बसला आहे. सणासुदीच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
अचानक मंडपात विद्युत प्रवाह
अग्निशमन दलाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा भीषण अपघात मध्यरात्री दोनच्या सुमारास घडला. रात्रीची वेळ असली तरी मंडप परिसरात भाविकांची उपस्थिती होती. अचानक मंडपात विद्युत प्रवाह पसरल्याने गोंधळ उडाला आणि दोन मुले तसेच तीन मुलींना विजेचा धक्का बसला.ही घटना घडताच मंडपात एकच गोंधळ उडाला आणि तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले.
मृत्यूचा आकडा 2 वर
अपघातानंतर त्वरित सर्व पाचही जखमींना उपचारासाठी भायखळा येथील मसीना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने डॉक्टरांनी आठ वर्षीय मुलीला मृत घोषित केले.तर आता काळाचौकी येथील घटनेत मृत्यूचा आकडा 2 वर गेला. सुजाता बलराज थोतेटी ( 33 वर्ष )तर दुसरी रागिनी ( 8 वर्ष ) यांचा मृत्यू झाला. तर 3 जणांवर उपचार सुरू आहेत.
आयसीयूमध्ये उपचार सुरु
दरम्यान, मसीना रुग्णालयात दाखल असलेल्या उर्वरित तीन जखमींची प्रकृतीही गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद घेत प्रशासनाने तपास सुरू केला असून, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना आणि विजेच्या जोडणीची काळजी घेण्याची गरज या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
, नक्की काय घडल? याचा तपास सुरु
अग्निशमन दल, स्थानिक पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. नक्की काय घडले याचा तपास हा पोलिसांकडून केला जात आहे. गणेशोत्सवाच्या काळात लोक मोठ्या संख्येने गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी घराबाहेर पडत आहेत. त्यातच ही घटना घडल्याचे कळतंय. मात्र, नक्की काय घडले याबाबत काही माहिती पुढे येऊ शकली नाही. सध्या काहींवर उपचार सुरू आहेत.








