
मुरासु आणि अर्णब चक्रीवादळाने भारतातील अनेक भागात धुमाकूळ घातला असतानाच बंगालच्या खाडीत मोठे चक्रीवादळ धडकले आहे. ज्यानंतर भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला आहे. त्यातच आता नवीन चक्रीवादळाचा अलर्ट जारी करण्यात आला.या महिन्यातील हे मोठे तिसरे चक्रीवादळ आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, 16 नोव्हेंबर रोजी कमी दाबाचा पट्टा चक्रीवादळात रूपांतरीत होईल.
जोरदार वाऱ्यासह अतिमुसळधार पावसाची शक्यता
17 नोव्हेंबर रोजी हे तूफान चक्रीवादळ पुढे सरकेल. आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात हे वादळ धडकेल. ओडिसा, तामिळनाडूसह अन्य राज्यात या वादळाचा तडाखा बघायला मिळाले. जोरदार वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस यादरम्यान होण्याची शक्यता आहे. काही राज्यात या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तयारीही सुरू करण्यात आली. ओडिसा सरकारने या चक्रीवादळाच्या इशाऱ्यानंतर उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये तयारीही सुरू केली.
24 जिल्ह्यांवर बारीक लक्ष
मंत्री सुरेश पुजारी यांनी सांगितले की, चक्रीवादळाच्या इशाऱ्यानंतर आम्ही काही टीम तैनात केल्या आहेत. 24 जिल्ह्यांवर बारीक लक्ष आहे. एनडीआरएफ, ओडीआरएएफ आणि आपत्कालीन सेवा तयार ठेवल्या आहेत. 18 आणि 19 रोजी दाखल होणाऱ्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नियोजन केले आहे. मच्छीमारांनाही समुद्रात न उतरण्याचा इशारा देण्यात आला.
महाराष्ट्रातील काही भागात पाऊस होण्याचा अंदाज
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, तामिळनाडूच्या उत्तरेकडील जिल्ह्यांना या चक्रीवादळाचा फटका बसेल. पुडुचेरी आणि कराईकल जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला. पश्चिम बंगालच्या काही भागातही पावसाचा इशारा देण्यात आला. महाराष्ट्रातील काही भागात पाऊस होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात यंदा दुष्काळ जाहीर करण्यात आला. राज्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. मात्र, चक्रीवादळामुळे मोठा दिलासा मिळत असून थोड्याफार प्रमाणात पाऊस कोसळताना दिसत आहे.
अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
अर्णब चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पाऊस झाला. आता या चक्रीवादळादरम्यानही राज्यातील काही भागात पाऊस होईल. हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात 150 प्रती किमी वेगाने धडकण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेशात प्रशासनाकडून या वादळाच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू आहे. यादरम्यान अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्याचीही माहिती मिळत आहे. प्रशासन अलर्ट मोडवर आहे.








