मढ आयलँड येथील रहेजा ओशन एक्सोटिका परिसरात सुरू असलेल्या बांधकामामुळे धूळ आणि वायुप्रदूषणाची समस्या निर्माण झाल्याच्या स्थानिक रहिवाशांच्या तक्रारीनंतर आमदार असलम शेख यांनी या प्रकरणात पुढाकार घेतला. त्यांच्या हस्तक्षेपानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने संबंधित बांधकामाला काम थांबविण्याची नोटीस दिल्याचा उल्लेख परिसरात लावण्यात आलेल्या बॅनरवर करण्यात आला आहे.
बांधकामादरम्यान मोठ्या प्रमाणात धूळ पसरत असल्याची बाब
मढ आयलँड हे पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. या परिसरात दोन ते तीन इमारतींची बांधकामे सुरू असल्याने बांधकामादरम्यान मोठ्या प्रमाणात धूळ पसरत असल्याची बाब समोर आली होती. यामुळे स्थानिक रहिवाशांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. परिसरालगत कांदळवन क्षेत्र असल्याने संभाव्य धूळ प्रदूषणाचा स्थानिक पर्यावरणावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
बॅनरवर नेमका काय उल्लेख?
बॅनरवरील इंग्रजी मजकुरानुसार, रहेजा ओशन एक्सोटिका, मढ आयलँड येथे सुरू असलेल्या बांधकामामुळे होणाऱ्या धूळ आणि वायुप्रदूषणाबाबत स्थानिक रहिवाशांनी तक्रार केली होती. या तक्रारीची दखल आमदार असलम शेख यांनी घेतल्यानंतर, त्यांच्या हस्तक्षेपामुळे BMC ने ‘STOP WORK NOTICE’ जारी करून बांधकामाचे काम थांबवण्याचे निर्देश दिल्याचा उल्लेख बॅनरवर आहे.
नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि स्वच्छ हवेसाठी रहिवाशांच्या पाठीशी आमदार अस्लम शेख
तसेच, नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि स्वच्छ हवेसाठी रहिवाशांच्या पाठीशी उभे राहून तातडीने कार्यवाही केल्याबद्दल आमदार असलम शेख यांचे आभारही या बॅनरद्वारे मानण्यात आले आहेत. दरम्यान नागरिकांचे आरोग्य आणि पर्यावरणाचे संरक्षण या दृष्टीने बांधकामस्थळी धूळ नियंत्रणाच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे.








