अंधेरी परसिरात शनिवारी सकाळी म्हणजे (२६ जुलै)रोजी एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं. घरगुती वादातून, अगदी शुल्लक कारणावरून मुलाला राग अनावर झाल्याने थेट त्याच्या आई-वडिलांवर चाकूने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात इजाज कुरेशी आणि मेमुना इजाज कुरेशी असे दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये प्राथमिक औषधोपचार करण्यात आले आहे. याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन २७ वर्षांचा आरोपी नबिल कुरेशी याला अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. घडलेल्या या थरारक घटनेमुळे स्थानिक रहिवाशांमध्येही भीतीचं वातावरण आहे.
शुल्लक कारण अन् वादातून आई-वडिलांवर वार
ही घटना शनिवारी सकाळी पावणेअकरा वाजता अंधैरीतील वर्सोवा-यारी रोड, मोती अपार्टमेंटमध्ये घडली. याच अपार्टमेंटच्या एफ ४७ मध्ये हाजिक इजाज कुरेशी हे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहत असून ते सिव्हील इंजिनिअर म्हणून काम करतात. शनिवारी सकाळी त्यांचे वडिल इजाज आणि आई मेमुना यांच्यात क्षुल्लक कारणावरुन कौटुंबिक वाद झाला होता.या वादातून रागाच्या भरात घरात असलेला त्यांचा मोठा भाऊ नबिलने त्यांचे वडिल इजाज यांच्या चेहर्यावर चाकूने वार करुन त्यांना गंभीर दुखापत केली होती. त्यानंतर त्याने त्याची आई मेमुना हिच्या चेहर्यावर आणि हातावर अशाच प्रकारे चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही जखमी झाले.
आरडाओरड झाल्याने स्थानिक रहिवाशांची धाव
अचानक आरडाओरड झाल्याने स्थानिक रहिवाशांनी तिथे धाव घेतली होती.घडलेला प्रकार समजताच चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या दोघांनाही तातडीने स्थानिक रहिवाशांनी जवळच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्यांच्यावर प्राथमिक औषधोपचार करण्यात आले. या घटनेबद्दल पोलिसांनाही माहिती देण्यात आली. ही माहिती स्थानिक रहिवाशांकडून प्राप्त होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपशिखा वारे व त्यांच्या पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. याप्रकरणी हाजिक कुरेशी याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी त्याचा मोठा भाऊ नबिल कुरेशी याच्याविरुद्ध पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
काम नसल्यामुळे मानसिक तणावात होता आरोपी मुलगा
मिळालेल्या माहितीनुसार नबिल हा काहीच कामधंदा करत नाही.गेल्या दोन वर्षांपासून तो मानसिक तणावात आहे. त्याच्यावर औषधोपचार सुरु होते. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून तो औषधे घेत नव्हता. त्यात शनिवारी सकाळी झालेल्या भांडणाला कंटाळून त्याने त्याच्या माता-पित्यावर चाकूने हल्ला केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपशिखा वारे यांनी देखील याबाबतची माहिती दिली आहे.








