महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, तालुका अभियान कक्ष, पंचायत समिती श्रीवर्धन अंतर्गत कार्यरत असलेल्या ‘दिशा महिला प्रभाग संघ, बोर्ली पंचतन’ यांची वार्षिक सर्वसाधारण सभा बोर्ली पंचतन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात अत्यंत उत्साहात पार पडली. या सभेला स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि विविध महिला बचत गटांच्या पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे अन् सायबर सुरक्षेबाबत धडे
ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, प्रशासकीय योजनांची माहिती देणे आणि सायबर धोक्यांपासून त्यांचे रक्षण करणे आवश्यक आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात वाढत्या ऑनलाईन फसवणुकीच्या घटना लक्षात घेता, सभेदरम्यान विशेष जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले होते. दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आवटी यांनी उपस्थित महिलांशी थेट संवाद साधत सायबर सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण धडे दिले.ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी मोबाईलवर येणारा ओटीपी, बँक खाते क्रमांक, एटीएम कार्डची माहिती किंवा पासवर्ड कोणाशीही शेअर करू नये, तसेच संशयास्पद लिंक्सवर क्लिक करू नये, असे आवाहन त्यांनी केलं आहे.
लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती
या कार्यक्रमाला श्रीवर्धन पंचायत समितीचे सभापती मा.श्री. सचिन नंदाकर किर, उपसभापती मा. श्रीम. पूजा प्रशांत शिंदे, रायगड जिल्हा परिषद सदस्या मा. श्रीम. वासंती मंगेश गुणाजी व मा. श्रीम. वैभवी मंगेश कोमनाक, तसेच पंचायत समिती सदस्य मा. श्री. सुकुमार दत्तात्रेय तोंडलेकर व मा. श्रीम. अस्मिता प्रदर्शन चोरगे उपस्थित होते.
याशिवाय, प्रशासनाच्या वतीने गटविकास अधिकारी मा. श्री. राजू किरवे, तालुका अभियान व्यवस्थापक (NRLM) मा. श्री. स्वप्निल जाधव, बालविकास प्रकल्प अधिकारी मा. श्री. प्रफुल बागल आणि तालुका कृषी अधिकारी मा. श्रीम. श्रद्धा डुंबरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
विविध ग्रामसंघांचा उत्स्फूर्त सहभाग
दिशा महिला प्रभाग संघाच्या अध्यक्षा सौ. मानसी मकरंद जाधव, सचिव सौ. सिद्धी सिद्धेश कोसबे, कोषाध्यक्ष सौ. संजीवनी सिद्धेश्वर आंजर्लेकर आणि तालुका प्रभाग समन्वयक श्री. किशोर गोरटे यांच्या नियोजनाखाली या सभेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या सभेला सह्याद्री, केतकी, एकजूट, नारीशक्ती, उन्नती, हिरकणी, सागरिका, यशस्वी, नाविका, जय महिला, रणरागिणी आणि पंचशील या विविध ग्रामसंघांच्या महिला पदाधिकारी, ग्रामसखी व सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.








