महाराष्ट्रातील बहुचर्चित आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या वाद म्हणजे शिवसेना पक्ष आणि अधिकृत ‘धनुष्यबाण’ चिन्ह नक्की कोणाचे? शिंदे की ठाकरे. बऱ्याच दिवसांपासून याबाबत कोर्टात युक्तीवाद सुरु आहे. मागील काही दिवसांपासून या प्रकरणाची लागोपाठ सुनावणी झाल्याने लवकरच निकाल लागेल, असे म्हटले जातेय. आज म्हणजे १८ ऑगस्ट २०२६ रोजी शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी होणार आहे.दुपारी 2 वाजता सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरूवात होणार आहे.
आज सुनावणीत सुरूवातीला कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद
सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. कपिल सिब्बल यांनी मागच्या सुनावणीदरम्यान जोरदार युक्तीवाद केला.आजही उद्धव ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ व वकील कपिल सिब्बल न्यायालयात जोरदार युक्तिवाद करणार आहेत. यापूर्वी झालेल्या सुनावण्यांमध्ये सिब्बल यांनी, विधिमंडळ पक्षातील फूट ही मूळ राजकीय पक्षातील फूट मानली जाऊ शकत नाही आणि निवडणूक आयोगाचा निर्णय कायदेशीरदृष्ट्या चुकीचा आहे, असा युक्तिवाद करत आयोगाच्या अधिकारांवरच प्रश्न उपस्थित केले होते.
निवडणूक आयोगावर त्यांनी ताशेरे ओढले
कपिल सिब्बल यांनी अपात्रता आणि पक्ष चिन्ह यावर अधिक जोर दिला. युक्तिवादावेळी जनता दल, समाजवादी पार्टी यांचेही संदर्भ देण्यात आली. निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी कसे निर्णय दिले, याबाबतही सिब्बल यांनी युक्तिवाद केला. यासोबतच निवडणूक आयोगाने आपल्या कक्षाबाहेर जात काही निर्णय शिंदेंच्या बाजूंनी घेतल्याचेही त्यांनी म्हटले. निवडणूक आयोगावर त्यांनी ताशेरे ओढले. आजच्या सुनावणीत सुरूवातीला ठाकरेंकडून कपिल सिब्बल युक्तीवाद सुरू करतील.
पक्ष चिन्हावर ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलेला दावा खोडण्याचे मोठे आव्हान शिंदेंच्या शिवसेनेकडे असेल. कारण कपिल सिब्बल यांनी बाजू मांडताना संघटनात्मक नियम आणि संघटना कोणाच्या बाजूने आहे, हे सांगितले. पक्षाच्या घटनेत कधी बदल झाला हे देखील त्यांनी सांगितले. सर्व अधिकार अध्यक्ष ठाकरेंकडेच असल्याचेही त्यांनी म्हटले.
नेमका वाद काय?
केंद्रीय निवडणूक आयोगाने १७ फेब्रुवारी २०२३ रोजी आमदारांच्या संख्येचे (बहुमताचे) कारण देत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला अधिकृत ‘शिवसेना’ म्हणून घोषित केले आणि धनुष्यबाण हे चिन्ह त्यांना बहाल केले. संघटनात्मक बहुमत, पक्षाची मूळ घटना आणि पक्षप्रमुखांचे अधिकार डावलून केवळ आमदार-खासदारांच्या संख्येवर पक्षाची मालकी ठरवता येत नाही, असा दावा ठाकरे गटाने याचिकेत केला आहे. त्यासोबतच शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयालाही ठाकरे गटाने आव्हान दिले आहे.
अंतिम सुनावणीच्या निकालावर महाराष्ट्रातील आगामी राजकीय दिशा ठरणार
दरम्यान मागच्या सुनावणीमध्ये त्यांनी कोर्टाला त्यांच्याकडे असलेले काही कागदपत्रे घेण्यास विनंती केली होती. यासोबतच निवडणूक आयोगात दाखल केलेल्या कागदपत्रांची निवडणूक आयोगाकडून मिळालेली पोहोच पावतीही त्यांनी कोर्टात दाखवली.त्यामुळे आज काय निकाल लागणार याकडे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे. कारण या अंतिम सुनावणीच्या निकालावर महाराष्ट्रातील आगामी राजकीय दिशा आणि दोन्ही गटांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे आज न्यायालयात काय युक्तिवाद होतो आणि न्यायालय काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.








