रविवारी २० सप्टेंबरच्या सकाळी मुंबई कोस्टल रोडवरील एका पुलावर पहाटे एक थरारक घटना घडल्याचं समोर आलं आहे. पूलावरून भरधाव वेगाने जाणारी बीएमडब्ल्यू कार थेट पूलाच्या खाली कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आणि एक जण गंभीर जखमी झाला.हा अपघात लाला कॉलेजसमोर, लोटस जेटीजवळ घडला. भरधाव वेगाने येणाऱ्या BMW कारचा हा अपघात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
कार थेट पूलावरून खाली कोसळली.
काळ्या रंगाची बीएमडब्ल्यू कार मरीन ड्राईव्हकडून कोस्टल रोडवर हाजी अलीच्या दिशेने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याचे सांगण्यात आले आहे. भरधाव वेगात असलेल्या या वाहनाने एका संरक्षक भिंतीला धडक दिली आणि त्यानंतर ते एका पुलावरून खाली कोसळल्याचं म्हटलं जात आहे. मुंबई कोस्टल रोड हा १०.५८ किमी लांबीचा एक हाय-स्पीड फ्रीवे आहे, जो दक्षिण मुंबईतील मरीन ड्राइव्हला वांद्रे-वरळी सी-लिंकच्या वरळी टोकाशी जोडतो.
मृतकांपैकी दोघांची ओळख पटली आहे.
नायर रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांपैकी दोघांची ओळख शनाय गज्जल (२१) आणि धैर्य सेठ (१७) अशी पटली आहे, तर एका अज्ञात २५ वर्षीय तरुणाला रुग्णालयात दाखल करताच मृत घोषित करण्यात आले. आणखी एका अज्ञात २० वर्षीय तरुणाची प्रकृती गंभीर असून त्याला ट्रॉमा वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. कोस्टल रोड कंट्रोल रूमने दिलेल्या माहितीनुसार, लाला लाजपत राय कॉलेजसमोरील लोटस जेट्टीजवळ कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. गाडीतील चारही जणांना तात्काळ जवळच्या महानगरपालिका-संचालित नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यापैकी तिघांना मृत घोषित करण्यात आले.
गाडीतील चौथ्या व्यक्तीची ओळख पटू शकली नाही.
गाडीतील चौथी व्यक्ती गंभीर जखमी झाली असून, सध्या रुग्णालयाच्या ट्रॉमा वॉर्डमध्ये तिची प्रकृती चिंताजनक आहे, असे अधिकाऱ्याने सांगितलं आहे. या व्यक्तीचं वय २० वर्ष असून या तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही.
View this post on Instagram
कारचं छप्पर आतल्या बाजूला चेपले गेलं
झालेल्या नुकसानीवरून अपघाताच्या तीव्रतेचा अंदाज येतो. गाडी पुलावरून लटकलेल्या एका फलकाला धडकली आणि त्याचे तुकडे तुकडे झाले. बीएमडब्ल्यू गाडीचेही मोठे नुकसान झाले. गाडीचे छप्पर आतल्या बाजूला चेपले गेले होतं, तर समोरची काच म्हणजे विंडशील्डचे शेकडो तुकडे झाले. गाडीचा पुढचा भाग पूर्णपणे चेपला होता, बंपर तुटून वेगळा झाला होता आणि गाडीचे आतील भाग उघडे पडले होते.
अपघाताचे नेमके कारण आणि कारचा वेग किती होता?
दरम्यान अपघातानंतर परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिसर सील केला आणि पुढील तपास सुरू केला. कारचा ताबा घेण्यात आला असून ती तांत्रिक तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. अपघाताचे नेमके कारण आणि कारचा वेग किती होता, याबाबत अधिक माहिती तपासाअंती समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले.








