आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पाश्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिनसेना पक्षाने जोरदार तयारी केली आहे. संघटनात्मक बांधणीसाठी शिंदे गटाने तयारी सुरू केली आहे. त्यासाठी चक्क पक्षाच्या तालुकाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना १३ नव्या बोलेरो गाड्या दिल्या जाणार आहेत.
तालुकाप्रमुखांना पक्षाच्या कामासाठी नव्या कोऱ्या कार
पक्षवाड आणि ग्रामीण भागातील संपर्क वाढवण्यासाठी पुढील आठवड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते तालुकाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना १३ नव्या बोलेरो गाड्यांचे वाटप होणार असल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे संपर्कप्रमुख आणि आमदार सुहास कांदे यांनी दिली. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी . शिवसेनेने ग्रामीण भागातील संघटन मजबूत करण्यासाठी नवी रणनीती आखली जात आहे. यासाठी नाशिक लोकसभा संपर्कप्रमुख, आमदार सुहास कांदे यांच्या पुढाकाराने नवीन रणनीती आखली असून यातून जिल्ह्यातील १३ तालुकाप्रमुखांना पक्षाच्या कामासाठी नव्या कोऱ्या कार देण्यात येणार असल्याचं म्हटलं.
या नव्या कार पुढारीपणा मिरवण्यासाठी नाहीतर त्याद्वारे गावागावांत पक्षाचा संपर्क वाढविण्यावर भर दिला जाणार असून. त्या कारच्या मदतीने गावागावात संपर्क वाढवून संघटन मजबूत केलं जाईल, असा विश्वास कांदेंना आहे. जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने पक्ष संघटन बळकट करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.
कारचा वापर केवळ पक्षाच्या संघटनात्मक कामासाठी
विधानसभा आणि महापालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तयारीला पक्षाने वेग दिलाय. त्याचाच भाग म्हणून तालुकाप्रमुखांना पक्षाच्या कामासाठी वाहने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आमदार सुहास कांदे यांच्या पुढाकाराने १३ कार खरेदी करण्यात आल्या आहेत. या कारचा वापर केवळ पक्षाच्या संघटनात्मक कामासाठी करण्याची सूचना तालुकाप्रमुखांना देण्यात येणार आहे.
यासह तालुका प्रमुखांच्या दैनंदिन कामाचा अहवालही घेतला जाणार आहे. पक्षाला वर्षभर निवडणूक मोडमध्ये सक्रिय ठेवण्याच्या दृष्टीने ही व्यवस्था करण्यात आल्याची माहिती आमदार कांदे यांनी दिलीय. तालुकाप्रमुखांना वाहनांची सुविधा मिळाल्यानंतर त्यांच्यावर घरोघरी संपर्क साधण्याची जबाबदारी सोपविली जाणार आहे.
वाहनांच्या वापराचा अहवाल घेतला जाणार
‘शिवसेना आपल्या दारी’ या अभियानांतर्गत पदाधिकारी गावागावांत संपर्क साधणार आहेत. तालुकाध्यक्षांवर घरोघरी पक्ष पोहोचवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली असून, वाहनांच्या वापराचा दैनंदिन अहवालही घेतला जाणार असल्याची माहिती देण्यात आली. पक्षाने वाहन सुविधा उपलब्ध करून दिल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. बुथप्रमुखांपासून तालुकास्तरावरील कार्यकर्त्यांपर्यंत पक्षाचा प्रचार-प्रसार वाढवण्यासाठी या वाहनांचा उपयोग होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
प्रत्येक कारवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची छायाचित्रे
प्रत्येक कारवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची छायाचित्रे लावण्यात येतील. यासह ‘शिवसेना आपल्या दारी’ असा संदेश देण्यात येणार आहे. श्रीकांत शिंदे लंडनहून परतल्यानंतर पुढील आठवड्यात या वाहनांचा लोकार्पण सोहळा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
यासोबतच २०२९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वाधिक लोकप्रतिनिधी निवडून यावेत यासाठी पक्षाची संघटना मजबूत करणं महत्त्वाचं आहे. शिंदेंची शिवसेना पक्षात असली तरी महायुतीमधील अंतर्गत राजकारण, मतभेद या पाहता स्वपक्षाचं सामर्थ्य बळकट करणं हा पक्षापुढील महत्त्वाचा पर्याय आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडून पदाधिकाऱ्यांना पक्षवाढीसाठी वाहनांची सुविधा करण्यात आली आहे.








