विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीची ५ मतदारसंघात कालपासून म्हणजे २७ ऑक्टोबरपासून मतमोजणी सुरु आहे. आज २८ ऑक्टोबरला ही सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. आज दुसरा दिवस उजाडला, त्यानंतरही पाचपैकी कोणत्याच जागेचा निकाल अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेला नाही. आज देखील मतमोजणी सुरु आहे. नागपूर, अमरावती,मराठवाडा आणि पुणे या मतदारसंघात निवडणूक होती. २३ ऑक्टोबरला झालेल्या मतदानात १८२ उमेदवारांचं भविष्य मतपेटीत बंद झालंय.
शरद पवार पक्षाचाच पुन्हा एकदा दबदबा
दरम्यान २७ ऑक्टोबरच्या मोजणीनुसार पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या हर्षदा जाधव-देशमुख आघाडीवर असल्याचं दिसत होत्या आणि आता खरोखरंच पुणे विभागीय पदवीधर मतदार संघावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचाच पुन्हा एकदा दबदबा स्पष्ट झाला या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवार हर्षदा देशमुख जाधव यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव यांच्यावर विजय मिळवला. तर, शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार नगरसेवक सुनील मोदी यांचा फार टिकाव लागला नाही. मोदी यांना साडेतीन हजाराच्या आसपास मते मिळाली. पुणे पदवीधरमध्ये यंदा ४७ उमेदवार रिेंगणात होते.
हर्षदा देशमुख यांचा विजय
हर्षदा देशमुख यांच्या विजयानंतर शरद लाड यांच्या कुंडलमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. पुणे पदवीधर मतदार संघातून निवडून आल्यानंतर कुंडल इथं पहाटे ४ वाजता जल्लोष सुरु करण्यात आला आहे. रणसंग्राम सोशल फौंडेशनच्या दीपक लाड यांनी फटाके उडवले. हर्षदा देशमुख यांच्या विजयानंतर शरद लाड यांच्या कुंडलमध्ये आनंदोत्सव पाहायला मिळत आहे.
मतदारसंघात महायुतीमध्ये उमेदवारीसाठी शेवटपर्यंत नाट्य सुरू होती.
पुणे पदवीधर मतदारसंघात यंदा विजयासाठी आवश्यक कोटा एक लाख १३ हजार ११३ इतका निश्चित करण्यात आला होता. यंदाच्या निवडणुकीत तीन लाख ८८ हजार मतदारांची नोंदणी झाली होती. मतदान होऊन मतमोजणी प्रक्रियेंत दोन लाख २६ हजार २२४ मते वैध ठरली होती. पदवीधरची निवडणूक भारतीय जनता पक्षाने अतिशय प्रतिष्ठेची केली होती. या मतदारसंघात महायुतीमध्ये उमेदवारीसाठी शेवटपर्यंत नाट्य सुरू होती. पदवीधर उमेदवारीचा शब्द घेऊन भाजपात प्रवेश केलेले शरद लाड यांनी निवडणुकीची तयारी केली होती. मोठया संख्येने त्यांनी मतदार नोंदणी केली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे पदाधिकारी व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैया माने यांनी मतदार नोंदणी केली होती. त्यांनीही महायुतीकडून लढण्याची तयारी दर्शविली होती. पदवीधर मतदारसंघ हा भाजपच्या वाटयाला गेला. भाजपने लाड यांना डावलून डॉ. स्मिता योगेश जाधव यांना उमेदवारी दिली. तर अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेले भैया माने यांनी माघार घेत जाधव यांना पाठिंबा दिला. लाड यांनीही पक्षाचा आदेश मानून जाधव यांना पाठिंबा जाहीर केला होता.
महाविकास आघाडीकडून माजी विभागीय आयुकत प्रभाकर देशमुख यांची मुलगी हर्षदा देशमुख जाधव यांना उमेदवारी दिली. त्या रयतच्या कार्यकारिणी सदस्य आहेत. तसेच हर्षदा देशमुख जाधव यांचे सासरे हे पुणे जिल्ह्यात शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील वजनदार व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते.पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेते मंडळींनी मतदारसंघातील पाची जिल्ह्यामध्ये मेळावा घेतल्या होत्या.
हर्षदा जाधव यांचा विजयाचा कोटा पूर्ण
पुणे पदवीधरमध्ये पहिल्या फेरीमध्ये हर्षदा देशमुख जाधव यांना एक लाख १२ हजार ४०० मते मिळाली आहेत, तर महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव यांना एक लाख दोन हजार मत मिळाली आहेत. हर्षदा जाधव यांना विजयाचा कोटा पूर्ण करण्यासाठी ७१६ मतांची आवश्यकता राहिली. विजयासाठी मतांचा आवश्यक कोटा एक लाख तेरा हजार ११३ इतका आहे.
सर्वञ जल्लोष केला जात आहे
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रथम पसंतीच्या मतांची मोजणी पूर्ण झाल्यानंतरही विजयासाठी आवश्यक असलेला १ लाख १३ हजार ९५ मतांचा कोटा पूर्ण न झाल्याने पुढील पसंतीच्या मतांची मोजणी सुरू आहे. आतापर्यंत २१ व्या बाद फेरीनंतर हर्षदा देशमुख-जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार पक्ष) यांना १ लाख ११ हजार २७९ मते मिळाली आहेत, तर डॉ. स्मिता योगेश जाधव यांना १ लाख २ हजार ४२७ मते मिळाली आहेत. त्यामुळे हर्षदा देशमुख-जाधव यांनी डॉ. स्मिता जाधव यांच्यावर ८ हजार ८५२ मतांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे हर्षदा देशमुख-जाधव यांचा विजय निश्चित झाला असून सर्वञ जल्लोष केला जात आहे.








