
मुंबई: मुंबई शहराला वेगवान बनवण्यासाठी सरकार मेट्रो, कोस्टल रोड आणि सिमेंट रस्त्यांचे काम जलद गतीने करत आहे. पण या विकासाच्या झगमगाटात वर्सोवा जेट्टी परिसरातील स्थानिक नागरिक आणि पर्यटकांच्या समस्या मात्र दुर्लक्षित राहिल्या आहेत. मढ, भाट्टी, अक्सा, पटेलवाडी येथून अंधेरीच्या दिशेने येणाऱ्या लाखो प्रवाशांना दररोज अवैध पार्किंग, अतिक्रमण आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. यामुळे त्यांचा मानसिक त्रास आणि आर्थिक खर्च वाढला आहे.
वर्सोवा गल्लीतून बोट धक्क्यापासून मुख्य रस्त्यापर्यंतचा अवघा 500 मीटरचा प्रवास कधी कधी 20-30 मिनिटांचा ठरतो. रस्त्यावर अवैध पार्किंग, दुकानांचे अतिक्रमण आणि विक्रेत्यांच्या गर्दीमुळे हा प्रवास डोकेदुखी ठरतो. मेट्रो स्टेशनपर्यंत जाण्यासाठी ऑटो रिक्षा हा एकमेव पर्याय असतो, पण येथे फक्त शेअर ऑटोच उपलब्ध होतात. प्रत्येक प्रवाशाला 25 रुपये मोजावे लागतात, जिथे मीटरनुसार भाडे 45 रुपये असते. एका तीन व्यक्तींच्या कुटुंबाला 75 रुपये खर्च येतो. परत घरी येताना वाहतूक कोंडीमुळे ऑटो मिळणेही दुरापास्त झाले आहे.
सात बंगला ते मच्छीमार बस स्टॉप रस्त्यावर हॉटेल्सच्या गाड्यांनी रस्ते व्यापले आहेत. फुटपाथ गायब झाले असून, नागरिकांना चालण्यासाठी जागा नाही. अशा परिस्थितीत एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दलाचे वाहन पोहोचणार कसे? मनपा प्रशासनाने याची तपासणी करणे गरजेचे आहे.
वाहतूक प्रशासन आणि पोलिसांचा येथे अभाव जाणवतो. वाहतूक नियंत्रणाऐवजी केवळ सिग्नलवर कारवाई करण्यात प्रशासन व्यस्त आहे. स्थानिक प्रवाशांच्या समस्यांकडे लक्ष देण्याऐवजी प्रशासन अन्य कामात गुंतले आहे. यामागे ‘मलिदा’ मिळत नसल्याचे कारण असावे, अशी शंका नागरिक व्यक्त करत आहेत.
या गंभीर समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याची गरज आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी आपली कर्तव्ये पार पाडावीत, अशी अपेक्षा आहे. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ठोस पावले उचलली गेली नाहीत, तर भविष्यात येथील परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती आहे.
अशाच निर्भीड बातम्या पाहण्यासाठी पहा जागृत रहा जागृत