
राजधानी मुंबईत आज सकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून मुंबई पुन्हा एकदा ‘तुंबई’ बनल्याचं चित्र आहे. पावसाचा सर्वाधिक फटका मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बसला असून नव्याने सुरू झालेल्या मेट्रो 3 अर्थात ‘ॲक्वा लाईन’च्या भुयारी स्थानकांमध्ये पाण्याचे तळे साचल्याचे धक्कादायक दृश्य समोर आले आहे.
मेट्रोच्या उद्घाटनावर प्रश्नचिन्ह
राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी मोठ्या धुमधडाक्यात आरे ते वरळीदरम्यान धावणाऱ्या भुयारी मेट्रोचा लोकार्पण सोहळा पार पाडला होता. यावेळी सरकारने ही मेट्रो अत्याधुनिक असून, पावसाळ्यात कोणताही धोका नसल्याचा दावा केला होता. मात्र, पहिल्याच पावसात भुयारी मेट्रोच्या व्यवस्थेची पोलखोल झाल्याचं चित्र समोर आलं आहे.
आदित्य ठाकरेंची मेट्रो स्थानकाला भेट
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबई मेट्रोच्या भुयारी स्टेशनला भेट देत प्रशासनाच्या दाव्यांची चिरफाड केली. “स्थानकाचं काम सुरू आहे असं प्रशासन सांगतंय, मग उद्घाटन कोणत्या स्टेशनचं झालं?” असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला. याशिवाय त्यांनी दादरच्या हिंदमाता भागातील पाणी साचलेल्या भागाचा व्हिडिओ ट्विटरवरून शेअर करत मुंबई महापालिकेवर निशाणा साधला.
“आम्ही चार वर्षांपूर्वीच हिंदमाता परिसर वॉटर लॉगिंग फ्री केला होता. मात्र, भाजपने महापालिकेवर नियंत्रण मिळवल्यानंतर एकाच पावसात शहराची अवस्था बघायला मिळत आहे. पालिकेने कोणतीही पावसाळ्यापूर्व तयारी केली नाही,” असा आरोपही त्यांनी केला.
एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर
आदित्य ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, “ही पोलखोल कशी? पाऊस जर 15 दिवस आधी आला तर काय होणार? 10 जूननंतर पावसाची तयारी केली जाते. नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून सर्व यंत्रणा सतर्क आहेत.”
ते पुढे म्हणाले, “मी कंट्रोल रूममधून सर्व स्पॉट पाहिले आहेत, आता कुठेच पाणी साचलेलं नाही. नरिमन पॉइंटला 252 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुख्यमंत्री सातत्यानं संपर्कात आहेत.”
दरम्यान, माहिम येथील म्हाडा इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली असून, संबंधित रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहितीही एकनाथ शिंदेंनी दिली.
मुंबईतल्या पहिल्याच पावसात नव्याने सुरू झालेल्या भुयारी मेट्रोचा कारभार उघड झाल्याने राज्य सरकारची अडचण वाढली आहे. विरोधकांनी प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तीव्र टीका केली असून, सरकारकडूनही प्रत्युत्तर देत स्थिती नियंत्रणात असल्याचं सांगितलं जात आहे. आता येणाऱ्या दिवसांत मुंबईचा पावसाळा प्रशासनासाठी किती कठीण ठरणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.