रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील खांडपे-कोंदिवडे रस्त्याच्या दुरावस्थेवर हटके स्टाईलमध्ये रिपोर्टिंग करणाऱ्या शाळकरी मुलींचा व्हिडीओ ऑगस्ट २०२६ च्या सुरुवातीला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्याचा इम्पॅक्ट इतका झाला आहे की आता शाळकरी विद्यार्थी अगदी बिन्धास्तपणे आपापल्या गावातील समस्या प्रशासनासमोर मांडत आहेत.
रिपोर्टर बनून विद्यार्थ्यांनी मांडली भीषण पाणीटंचाई
अशीच एक समस्या घेऊन काही चिमुकले समोर आले आहेत. या लहानग्यांनी आपल्या गावातील पाण्याची भीषण समस्या मांडली आहे. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात असलेल्या खारेपाट आणि वढाव गावात सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. वारंवार तक्रार करूनही प्रशासन दखल घेत नसल्याने शाळकरी मुल रस्त्यावर उतरली. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी येथील शाळकरी मुलांनी थेट ‘रिपोर्टर’ची भूमिका बजावत एक अनोखा व्हिडिओ तयार केला, जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.या मुलांनी गावातील पाणी टंचाईचे वास्ताव आपल्या शब्दात रिपोर्टर स्टाईल मांडल आहे.
चिमुकल्या विद्यार्थ्यांनी स्वतः हातात माईकसारखे साधन घेतलं अन्
पेणच्या खारेपाट परिसराला शहापाडा प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेतून पाणी दिले जाते. मात्र, गेल्या काही काळापासून येथील विस्कळीत नियोजनामुळे नागरिकांना अनेक दिवसांआड पाणी मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. नेहमीच्या पद्धतीने आंदोलने किंवा तक्रारी करूनही प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे, चिमुकल्या विद्यार्थ्यांनी स्वतः हातात माईकसारखे साधन घेऊन आपल्या गावातील पाण्याची परिस्थिती या व्हिडीओद्वारे समोर आणली आहे.
गावाची परिस्थिती कॅमेऱ्यासमोर मांडली
एका न्यूज चॅनेलच्या प्रोफेशनल पत्रकाराप्रमाणे या विद्यार्थ्यांनी आपल्या गावाची परिस्थिती कॅमेऱ्यासमोर मांडली. गावात पाणी कसे येत नाही, लोकांना किती त्रास होत आहे हे देखील या मुलांनी सांगितलं आहे. गावातील लोक पाण्याविना किती संकटांना सामोर जातायत हे देखील या मुलांनी सांगितलं. तसेच कित्येक वेळा विद्यार्थ्यांनाही अंघोळ न करताच शाळेत जावं लागतं असंही ते म्हणाले. एकंदरीतच आपल्या गावातील पाणी टंचाईचे भीषण वास्तव मांडत या विद्यार्थ्यांनी थेट ग्राउंड रिपोर्ट केला आहे.
View this post on Instagram
सोशल मीडियावर या मुलांच्या धाडसाचे कौतुक होत असून
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर या मुलांच्या धाडसाचे कौतुक होत असून, “आता तरी प्रशासनाला जाग येईल का?” असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. त्यामुळे आता या मुलांचे गाऱ्हाणे प्रशासनापर्यंत पोहोचणार का? त्यावर काही ठोस निर्णय घेतला जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.








