मुंबई गणेशोत्सवात प्रसिद्ध मंडळांच्या बाप्पाच्या विसर्जनाबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.मुंबईच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्लीच्या ‘मुंबईच्या राजा’ चे यंदा 99 वे वर्ष आहे. या वर्षी बाप्पाच्या विसर्जनासाठी एक ऐतिहासिक आणि अनोखी व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईच्या गणेशोत्सवाच्या इतिहासात प्रथमच 22 फूट उंच ‘मुंबईच्या राजा’ चे विसर्जन अत्याधुनिक बार्ज जहाजाच्या माध्यमातून थेट खोल समुद्रात करण्यात येणार आहे.
25 सप्टेंबरला विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 7 वाजता ‘मुंबईच्या राजा’ची शेवटची महाआरती करण्यात येणार आहे. त्यानंतर विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल. गणेशगल्लीपासून सुरू होणारी ही मिरवणूक मुंबईच्या गणेशोत्सवातील आपल्या पारंपरिक मार्गाने लालबाग ते गिरगाव चौपाटीपर्यंत जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे.
गणेशोत्सवाच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रयोग
यंदाच्या विसर्जनाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे 22 फूट उंच ‘मुंबईच्या राजा’ चे गिरगाव चौपाटी येथे अत्याधुनिक बार्ज जहाजावरून थेट खोल समुद्रात विसर्जन करण्यात येणार आहे. मुंबई गणेशोत्सवाच्या इतिहासात अशा प्रकारे विसर्जन करण्याचा हा पहिलाच प्रयोग ठरणार आहे. लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात येणारा हा निर्णय ऐतिहासिक आणि पथदर्शी ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
बाप्पाचे बार्ज जहाजाच्या माध्यमातून खोल समुद्रात विसर्जन केलं जाणार
ऐतिहासिक विसर्जनासाठी शुक्रवार, 25 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 8 ते 11 ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. मुंबईच्या गणेशोत्सवात असा प्रयोग पहिल्यांदाच होत असून, हा निर्णय ऐतिहासिक व पथदर्शी ठरणार आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, मुंबई पोलीस आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या मान्यतेनुसार, या ऐतिहासिक विसर्जनासाठी शुक्रवार, 25 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 8 ते 11 ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. पारंपरिक विसर्जन मिरवणुकीनंतर गिरगाव चौपाटी येथे पोहोचल्यानंतर बाप्पाचे बार्ज जहाजाच्या माध्यमातून खोल समुद्रात विसर्जन केले जाणार आहे.
1977 पासून उंच गणेशमूर्तीची परंपरा
लालबागमधील प्रसिद्ध ‘मुंबईचा राजा’ हा लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्लीच्या वतीने आयोजित करण्यात येणारा अत्यंत जुना आणि भव्य गणेशोत्सव आहे. भव्य गणेशमूर्ती आणि आकर्षक देखाव्यांसाठी हे मंडळ विशेष प्रसिद्ध आहे. देशातील विविध प्रसिद्ध मंदिरांच्या प्रतिकृतींसह अनेक भव्य देखावे दरवर्षी येथे साकारले जातात. विशाल गणेशमूर्तीची परंपराही या मंडळाच्या गणेशोत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य राहिले आहे. 1977 मध्ये मंडळाने भारतात पहिल्यांदा 22 फूट उंच गणेशमूर्तीची परंपरा सुरू केली. 2004 मध्ये या बाप्पाला “मुंबईचा राजा” म्हणून नाव देण्यात आले.








