नाशिक जिल्ह्यामध्ये शनिवारी ८ ऑगस्ट रोजी रात्री पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर येत आहे. रात्री सुमारे 10 वाजण्याच्या दरम्यान 4.3 मॅग्निट्यूडचा भूकंप नोंदवण्यात आला आहे. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या नोंदीनुसार हा भूकंप रात्री 10 वाजून 1 मिनिटाच्या सुमारास झाला. नाशिकमध्ये शनिवारी रात्री अचानक झालेल्या भूकंपाच्या धक्क्यांनी नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं. याआधी देखील 6 ऑगस्ट रोजी भूकंपाचे धक्के जाणवले होते. तर 25 जुलैपासून आतापर्यंत 22 वेळा नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले असल्याचं समोर आलंय.
भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.3 होती
८ ऑगस्ट रोजी रात्री जाणवलेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.3 असून नाशिक शहरातील सातपूर, इंदिरानगर, मेन रोड, पंचवटी, हिरावाडी आणि पाथर्डी पाडा परिसरासह शहराच्या विविध भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय ग्रामीण भागातील कसारा घाटापासून रामशेत किल्ल्याच्या परिसरापर्यंत काही ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सांगण्यात येत आहे.
घरांमध्ये भांडी आणि वस्तू पडल्याच्या घटना
भूकंपाच्या धक्क्यामुळे काही घरांमध्ये भांडी आणि वस्तू पडल्याच्या घटना घडल्याची माहिती आहे. एवढंच नाही तर काही इमारतींमध्ये लिफ्टमध्ये असताना नागरिकांना भुकंपाचे धक्के जाणवले.लिफ्ट सुरळीत सुरु असतानाच अचानक इमारतीला तीव्र हादरे बसू लागल्याचं नागरिकांनी सांगितलं.
प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
भूकंपाच्या या धक्क्यांमुळे नाशिक जिल्ह्यात कुठेही कसल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही,अशी माहिती समोर येत आहे. मात्र, असे असले तरी कोणताही संभाव्य धोका टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नागरिकांनी अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.तसेच भूकंपाची तीव्रता तुलनेने कमी असल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अधिकृत सूचनांचे पालन करावे
मात्र, गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात भूकंपाचे धक्के जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दक्षता वाढवण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाकडून मिळणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले








