महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिराबाबत एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. तुळजाभवानी मंदिरात पुरुष भाविकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. पण ही प्रवेश बंदी पूर्णवेळ नसणार आहे तर आज, सोमवार १७ ऑगस्ट २०२६ रोजी नागपंचमी असल्याने ही बंदी असणार आहे.
काय आहे कारण आणि वेळ?
नागपंचमीनिमित्त पूर्वापार चालत आलेल्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेनुसार मंदिर संस्थानकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून भाविकांसाठी महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. आज सायंकाळी ५ ते ६ या एका तासाच्या कालावधीत पुरुष भाविकांना तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करता येणार नाही.
या वेळेत सुवासिनी महिलांकडून मंदिर परिसरात नागपूजन, ओवस भरणे, फेर-भुलई आणि इतर विविध पारंपरिक धार्मिक विधी पार पाडले जातात. या पारंपरिक विधींमध्ये महिलांना कोणतीही अडचण येऊ नये आणि त्यांना सुलभतेने पूजा करता यावी, यासाठी केवळ एका तासापुरती पुरुषांच्या प्रवेशावर मर्यादा घातली जाते.
मकर संक्रांतीलाही असते अशीच परंपरा
एवढंच नाही तर नागपंचमीनंतर मकर संक्रांत यांसारख्या सणांच्या वेळी ठराविक वेळेतही मंदिरात पुरुषांना बंदी असणार आहे. महिलांना पारंपरिक धार्मिक विधी, ओवस भरणे किंवा नागपूजन करता यावे म्हणून केवळ त्या विशिष्ट तासाभराच्या कालावधीत पुरुष भाविकांच्या प्रवेशावर तात्पुरती मर्यादा घातली जाते.
दरम्यान नागपंचमी हा सण महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि शहरी भागात मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. या दिवशी नागदेवतेचे पूजन करण्याची परंपरा असून, अनेक ठिकाणी महिलांकडून विविध पारंपरिक धार्मिक विधी केले जातात. तुळजाभवानी मंदिरातही नागपंचमीच्या निमित्ताने सुवासिनी महिलांकडून नागपूजनासह फेर-भुलई आणि इतर पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. नागपंचमीच्या दिवशी सायंकाळच्या वेळेत महिलांकडून मंदिर परिसरात पारंपरिक पद्धतीने धार्मिक विधी आणि खेळ पार पडतात.
दरवर्षी ठराविक वेळेत पुरुषांच्या मंदिर प्रवेशावर निर्बंध घालण्यात येतात
या कार्यक्रमांना पूर्वापार धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. याच परंपरेनुसार दरवर्षी ठराविक वेळेत पुरुषांच्या मंदिर प्रवेशावर निर्बंध घालण्यात येतात. यंदाही नागपंचमीच्या दिवशी सायंकाळी ५ ते ६ वाजेपर्यंत पुरुष भाविकांना मंदिरात प्रवेश करता येणार नाही. या कालावधीत सुवासिनी महिलांकडून नागपूजन आणि पारंपरिक कार्यक्रम पार पडणार
मंदिर संस्थानची पुरुष भाविकांना महत्त्वाची सूचना
दरम्यान, मंदिर संस्थानच्या या सूचनेची भाविकांनी नोंद घ्यावी आणि मंदिर प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नागपंचमीच्या निमित्ताने तुळजाभवानी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने भाविकांनी दर्शनाचे नियोजन करताना या वेळेची विशेष नोंद घेणे आवश्यक आहे. त्यामुळे आज नागपंचमीच्या दिवशी तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या पुरुष भाविकांनी सायंकाळी ५ ते ६ या वेळेत प्रवेशबंदी असणार असल्याचे लक्षात घेऊन आपल्या दर्शनाचे नियोजन करावं असं आवाहन करण्यात आलं आहे.








