राज्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाले आहेत.राज्यात दुष्काळाची परिस्थिती ओढावली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: विदर्भ आणि मराठवाड्यात जाऊन दुष्काळी भागाची पाहणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अखेर राज्यात दुष्काळ जाहीर केला आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरडा दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी विविध सवलती व उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत.
अखेर राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी राज्यात दुष्काळी दौरा केला होता. त्या दौऱ्यादरम्यान पाहिलेल्या परिस्थितीनुसार त्यांनी एक मोठा निर्णय घेतला आणि शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला आहे. फडणवीसांनी ट्रिगर १ लागू झालेल्या २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील 358 पैकी 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून राज्यात ७५ टक्के दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना काय मिळणार?
दुष्काळ जाहीर झालेल्या भागांतील शेतकऱ्यांना जमीन महसुलात सूट देण्यात येणार असून पीक कर्जाचे पुनर्गठन केले जाणार आहे. शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. कृषीपंपांच्या वीजबिलाबाबतही दिलासा देण्यात आला असून, ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषीपंपांचे वीजबिल यापूर्वीच माफ करण्यात आले होते. आता त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या कृषीपंपांच्या चालू वीजबिलातही सवलत दिली जाणार आहे.
पाणी टंचाईवरही उपाय
दुष्काळाचा परिणाम शेतीपुरता मर्यादित राहू नये, यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांसाठीही विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. रोजगार हमी योजनेच्या नियमांमध्ये शिथिलता आणून अधिकाधिक कामे सुरू केली जाणार आहेत. पाणी टंचाईवर उपाय म्हणून आवश्यक त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची व्यवस्था करण्यात येणार असून, पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी पाण्याचे नियोजन पूर्वीच्या आदेशांनुसार सुरू ठेवले जाणार आहे.एवढंच नाही तर पाणी टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकर्यांच्या शेतीपंपाची वीजजोडणी खंडित होणार नाही,
जनावरांच्या चाऱ्यासाठी चारा छावण्या सुरू
शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकरी आणि शेतमजुरांना अन्नधान्य उपलब्ध करून देण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्यासाठी चारा छावण्या सुरू करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी पाणी यासाठी आधीच्या आदेशाप्रमाणे नियोजन सुरुच ठेवले जाणार आहे. जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेऊन उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करण्यावर भर दिला जाणार आहे.
विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी
तसेच दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांनाही दिलासा देण्यात आला असून,शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजना अंतर्गत नियमात शिथिलता आणून अधिकाधिक कामे सुरु करण्यात येणार आहेत.
५ ऑक्टोबरपासून पंचनामे करण्यात येणार
दरम्यान, येत्या ५ ऑक्टोबरपासून पंचनामे करण्यात येणार आहेत. या पंचनाम्याची कार्यवाही तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकार्यांना देण्यात आले आहेत. पिकांची स्थिती दाखवणारे छायाचित्र, जीपीएस संकलित करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवस राज्यातील दुष्काळी भागाची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला होता. दोन दिवसात दुष्काळाचा जीआर काढण्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते. त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.








