तुमची ई-चलनाची रक्कम थकीत आहे का? असेल तर तुमचं वीजबिल नक्कीच जास्त येऊ शकतं. कारण आता ई-चलनाची थकीत रक्कम थेट वीज बिलातून वसूल केली जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यानंतर आकारण्यात आलेली ई-चलनाची रक्कम थकीत असल्यास त्याच्या वसुलीबाबत नव्या पर्यायांचा विचार केला जात आहे. पण असं खरंच होणार आहे का जाणून घेऊयात.
वाहनचालकांना आता मोठा झटका, ई-चलनाची थकीत रक्कम थेट वीज बिलातून वसूल
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि दंड न भरणाऱ्या बेफिकीर वाहनचालकांना आता मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. देशभरातील थकीत ई-चालान वसुलीसाठी सर्वोच्च न्यायालयाने एक अत्यंत कठोर आणि अनोखा प्रस्ताव समोर ठेवला आहे. वाहतूक दंडाची थकीत रक्कम थेट नागरिकांच्या वीजबिलाशी जोडता येईल का,याबाबत चाचपणी करण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत.
न्यायालयानं अत्यंत कडक शब्दात टिप्पणी केली, म्हणाले वीज कापली जाण्याची भीती असेल…
न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर रस्ते सुरक्षेशी संबंधित एका जनहित याचिकेवर सुनावणी सुरू होती. सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती पारडीवाला यांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर बोट ठेवत अत्यंत कडक टिप्पणी केली. “फक्त ई-चलान जारी करत राहणे पुरेसे नाही. यंत्रणेने कागदावर काम न करता प्रत्यक्ष जमिनीवर उतरून वसुलीवर भर दिला पाहिजे,” असे न्यायालयानंं स्पष्ट केलं. थकीत दंडाची रक्कम वीजबिलात समाविष्ट केल्यास लोक वीज कापली जाण्याच्या भीतीने तरी दंड भरतील, असा तर्क न्यायालयाने मांडला. यामागचं कारण म्हणजे ई-चलानच्या स्वरूपात थकीत असलेली कोट्यावधींची रक्कम.
देशभरात तब्बल ४५,००० कोटी रुपयांचा दंड थकीत
सुनावणीदरम्यान न्यायालयात सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, संपूर्ण देशात ई-चलानच्या स्वरूपात तब्बल ४५,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त दंडाची रक्कम थकीत आहे. यापैकी प्रशासनाला आतापर्यंत केवळ २५,००० कोटी रुपयांचीच वसुली करता आली आहे. अजूनही सुमारे २०,००० कोटी रुपयांचा मोठा निधी थकीत असल्याने न्यायालयाने यावर चिंता व्यक्त केली आहे. आणि म्हणूनच न्यायालयाने ई-चलनाची थकित रक्कम थेट वीज बिलातून वसूल करण्याचे नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता खरोखरंच वाहनचालकांनी आपल्या नावावर असलेली ई-चलनाची थकबाकी तपासून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे.
वीजबिलाव्यतिरिक्त दंड थकीत असणाऱ्यांवर ‘या’ ५ कडक कारवाया करण्यात येणार
सुनावणीदरम्यान चलान न भरणाऱ्यांवर न्यायालयाने आणखी कोणते कठोर कारवाया करता येतील याबाबतही चर्चा करण्यात आली आहे.
१. गाडीचे रजिस्ट्रेशन नूतनीकरण रोखणे: दंड थकीत असल्यास वाहनाची नोंदणी रिन्यू होणार नाही.
२. गाडी विक्री आणि मालकी हस्तांतरणावर बंदी: ई-चालान न भरल्यास गाडी दुसऱ्याच्या नावावर ट्रान्सफर करता येणार नाही.
३. ड्रायव्हिंग लायसन्स, फिटनेस आणि PUC रोखणे: थकीत चालान असल्यास परवाना नूतनीकरण, फिटनेस प्रमाणपत्र आणि पीयूसी मिळणार नाही.
४. परिवहन पोर्टलवर गाड्या ‘ब्लॅकलिस्ट’ करणे: दंड न भरणाऱ्या वाहनांना थेट परिवहन पोर्टलवर काळ्या यादीत टाकले जाईल.
५. गाडी जप्त म्हणजे Impound केली जाणार : रस्त्यावर अचानक तपासणी करून ज्या गाड्यांवर थकीत चालान आढळतील, त्या गाड्या थेट जप्त केल्या जातील.








