तुम्हीेदेखील आज मुंबईत गाडी घेऊन प्रवेश करत आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. किंबहूना मुंबईकरांसाठी ही बातमी खर्चात आणि चिंतेत टाकणारी आहे.ऑक्टोबरच्या पहिल्याच तारखेपासून मुंबईकरांच्या खिशाला चांगलाच भुर्दंड बसला आहे. कारण १ ऑक्टोबरपासून मुंबईत प्रवेश करणे अधिक महाग झाले आहे.
उड्डाणपुलांची वसुली मुंबईकरांच्या खिशातून
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबईच्या प्रवेशद्वारांवर असणाऱया पाचही टोल नाक्यांवरील पथकर दरात वाढ करण्यात आली आहे. मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलांची वसुली अजूनही कायम असून, या वसुलीचा नवा टप्पा आजपासून सुरू झाला आहे. याचाच अर्थ मुंबईतील ५५ उड्डाणपुलांचा खर्च वसूल करण्यासाठी उभारण्यात आलेल्या ५ मुख्य टोलनाक्यांवर आता महामंडळाने हा दरवाढीचा चाबूक चालवला आहे. गेल्या वर्षी हलक्या वाहनांना टोलमाफी देऊन मोठा दिलासा मिळाला असला, तरी आता मिनी बस, ट्रक आणि अवजड वाहनांना १५ ते ३५ रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
कोणत्या वाहनांना किती टोल
नव्या नियमानुसार, वाहनधारकांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे. मिनी बस, एल. सी. व्ही. वाहनांना ७५ रुपयांऐवजी ९० रुपये आकारले जाणार आहे. अवजड वाहनांना देखील अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे. ट्रक बस सारख्या वाहनांना १५० रुपयांहून थेट १८० रुपये मोजावे लागतील. तर अवजड १९० रुपयांऐवजी २२५ रुपये इतके मोजावे लागतील. नव्या दरांनुसार, एल.सी.व्ही वाहनाच्या दरात १५ रुपयांनी वाढ झाल्याचे समोर आलं आहे. तर ट्रक, बसच्या दरात ३५ रुपयांनी वाढ झालीये. त्यामुळे मुंबईच्या एन्ट्री प्रवेशावरील प्रवास आजपासून महागणार आहे.
ही वसुली २०२७ पर्यंत सुरू राहणार
दरम्यान या उड्डाणपुलाचा खर्च वसूल करण्यासाठी वाशी, ऐरोली, मुलुंड, एलबीएस आणि दहिसर अशा टोलच्या नाक्याची उभारणी करण्यात आली आहे. ही वसुली २०२७ पर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती मिळत आहे. सरकारने ऑक्टोबर २०२४ पासून हलके वाहन, बेस्ट बस, एसटी आणि शालेय वाहनांना टोल माफ करण्यात आला आहे. या निर्णयाने अनेकांना दिलासा मिळाला. परंतु मिनी बस, एल. सी. व्ही. वाहने, ट्रक, बस आणि अवजड वाहनांना पथकर लागू करण्यात आला आहे. तर तीन वर्षांनी टोल नाक्याच्या दरात एमएसआरडीसीकडून टोलची वाढ केली आहे.
अतिरिक्त खर्चाचा भार लादला
ऑक्टोबर २०२४ मध्ये राज्य सरकारने कार आणि एसटी गाड्यांना टोलमुक्त करून सर्वसामान्यांना दिलासा दिला होता. मात्र, दर तीन वर्षांनी होणाऱ्या दरवाढीच्या नियमावर बोट ठेवत MSRDC ने व्यावसायिक वाहनांवर पुन्हा एकदा अतिरिक्त खर्चाचा भार लादला आहे. २०२७ पर्यंत चालणाऱ्या या टोल वसुलीमुळे आता महागाई आणि मालवाहतुकीचा खर्च वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
टोलची दरवाढ ही २०२३ साली झाली होती. त्यानंतर तीन वर्षांनंतर एमएसआरडीसीकडून पुन्हा टोलच्या दरात मोठी वाढ केली आहे. याविषयी बुधवारी सूचना प्रसिद्ध करण्यात आली. नवीन टोल दर आज म्हणजेच १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबईकरांचा खिशाला काञी लागली आहे.








