मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर २ ऑक्टोबरच्या दिवशी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आणि ‘कॉकरोच जनता पार्टी’ च्या वतीने आयोजित आंदोलनात तरुणांचा प्रचंड मोठा जनसागर पाहायला मिळाला. या आंदोलनादरम्यान एका Gen Z चा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या तरुणीने देश आणि राज्यातील सद्यस्थितीवर तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे.हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
“मी जिथे पाहते, तिथे मला समस्याच दिसतात”
आंदोलनस्थळी जागृत महाराष्ट्राशी न्यूज चॅनलशी बोलताना या तरुणीने शिक्षण व्यवस्थेपासून ते रस्ते आणि पर्यावरणापर्यंतच्या मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरले. ती म्हणाली,
“मी जिथे कुठे पाहते, तिथे मला फक्त समस्याच दिसतात. रस्त्यांच्या कामात घोटाळा दिसतो, वातावरणातील प्रदूषण आणि हवामानाचा प्रश्न भीषण आहे, महिलांच्या हक्कांबद्दल सरकार काहीच करत नाहीये, आणि शिक्षण व्यवस्थेवर तर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आपल्या देशात असा एकही क्षेत्र उरलेले नाही, ज्याबद्दल प्रश्न उपस्थित होत नाहीत. सर्वच गोष्टींमध्ये भ्रष्टाचार वाढत चालला आहे. आपण ज्या गोष्टी वापरतो, ज्या राजकीय पक्षांना मतदान करतो, तिथून ते थेट शिक्षणापर्यंत सगळंच घोटाळेबाज आहेत. जर सगळ्याच गोष्टीत भ्रष्टाचार सुरू असेल, तर आम्ही नक्की विश्वास तरी कोणावर ठेवायचा?” असा सवाल तिने उपस्थित केला.
View this post on Instagram
“समस्या सोडवण्याऐवजी हिंदू-मुस्लिम राजकारण”
तरुणीने पुढे बोलताना सत्ताधाऱ्यांच्या धोरणांवर आणि राजकीय वक्तव्यांवर थेट निशाणा साधला. ती म्हणाली “सध्याचे सरकार फक्त हिंदू-मुस्लिम प्रश्नांना हवा देणे आणि स्वतःचा अजेंडा राबवणे यात व्यस्त आहे. एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करून ‘मित्रहो, मी तुमचा मित्र आहे’ असे सांगतात. पण जर सगळीकडे भ्रष्टाचार पसरला असेल आणि तरुण पिढीच्या समस्या ऐकूनच घेतल्या जात नसतील, तर तुम्ही आमचे मित्र कसे होऊ शकता?” असा आरोप करत तिने थेट मोदींनाच सवाल केला.
या तरुणीचा हा संतापाचा आणि सरकारला विचारलेल्या प्रश्नांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सकडूनही प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान या तरुणीप्रमाणे अनेकांनी राजकीय भूमिकेवर टीका केली आहे.
तरुण वर्गाचा आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळाला होता
शिवाजी पार्कबाहेर झालेल्या या आंदोलनात तरुण आणि विद्यार्थ्यांचा मोठा भरणा पाहायला मिळाला. प्रशासनाच्या नाकर्तेपणाला आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित करत CJP च्या कार्यकर्त्यांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी ताणून धरली आहे. या आंदोलनात बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनीही उपस्थिती दर्शवून आंदोलकांना पाठिंबा दिला होता.








