मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी रविवारी CJP संघटनेने शिवाजी पार्कात आंदोलन पुकारलं होतं. पोलिसांची कारवाई सुरू होताच शिवसेना नेते आदित्य ठाकरे, मनसे नेते अमित ठाकरे आणि तेजस ठाकरे थेट मैदानात उतरले. आदित्य ठाकरेंनी पोलिसांच्या गाडीवर चढून त्यांनी पोलिसांच्या दडपशाहीविरोधात थेट एल्गार पुकारला होता. माञ या गोंधळानंतर मुंबई पोलिसांनी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यावर रीतसर गुन्हा दाखल केला आहे.
आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यावर रीतसर गुन्हा दाखल
रविवारी ११ ऑक्टोबर CJP या संघटनेने निवडणूक आयोगाच्याविरोधात आणि ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी शिवाजी पार्कात आंदोलन पुकारण्यात आलं होतं. मात्र, पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. तरीही मोठ्या संख्येने तरुण-तरुणी शिवाजी पार्कात जमल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. आम आदमी पक्षाच्या नेत्या अंजली दमानिया यांच्यासह सुमारे ३०० आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
आदित्य ठाकरे यांनी पोलिसांच्या गाडीवर चढून घोषणाबाजी केली
शिवाजी पार्कच्या बाहेर जमा झालेल्या आंदोलकांची पोलिसांनी धरपकड सुरु केली होती. आंदोलनावरील पोलिसांच्या कारवाईची माहिती मिळताच अमित ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. आंदोलकांची धरपकड थांबवावी आणि ताब्यात घेतलेल्यांची सुटका करावी, या मागणीसाठी या नेत्यांनी थेट रस्त्यावर आणि शिवाजी पार्क पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडला. आदित्य ठाकरे यांनी पोलिसांच्या गाडीवर चढून कार्यकर्त्यांना संबोधित करत पोलिसांच्या कारवाईचा तीव्र निषेध केला होता.
बेकायदा जमाव जमवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याचा ठपका
ठाकरे बंधूंच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आणि पोलीस ठाण्याबाहेर जमाव जमवून दिलेल्या इशाऱ्यामुळे रविवारी रात्री उशिरा सर्व आंदोलकांना सोडण्यात आले. मात्र, या प्रकरणी आता पोलिसांनी कायदेशीर पाऊल उचलले आहे. परवानगी नसताना आंदोलन करणे आणि बेकायदा जमाव जमवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याचा ठपका ठेवत मुंबई पोलिसांनी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यावर रीतसर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आता यावर शिवसेना आणि मनसेकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं फार महत्त्वाचं ठरणार आहे.








