
राज्यात विविध भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने आढावा घेत असून संपूर्ण प्रशासनाला ‘अलर्ट मोड’वर राहण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या आहेत. नुकसानग्रस्त भागांमध्ये तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून, आपत्ती निवारणासाठी सर्व यंत्रणांना सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे.
राज्यात पुणे, सातारा, सोलापूर, रायगड, मुंबई आणि एमएमआर या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाची नोंद झाली आहे. पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये 117 मिमी, बारामतीत 104.75 मिमी, तर इंदापूरात 63.25 मिमी पावसाची नोंद झाली आहे. बारामतीमध्ये 25 घरांचे अंशतः नुकसान झाले असून, पुरात अडकलेल्या 7 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. 70 ते 80 कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.
इंदापूरमध्ये 2 जणांना पूरस्थितीतून वाचविण्यात आले असून, फलटणमध्ये तब्बल 163.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तेथे एनडीआरएफची एक टीम तैनात असून, दुधेबावी गावाजवळ अडकलेल्या 30 नागरिकांना निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यात 6 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. पंढरपूर येथे भीमा नदी पात्रात 3 जण अडकले असून, त्यांचे बचावकार्य सुरू आहे. रायगड जिल्ह्यात वीज पडून एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. महाड ते रायगड किल्ला रस्ता अतिवृष्टीमुळे बंद करण्यात आला आहे.
मुंबईत 24 तासांत 135.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे. शहरातील 6 ठिकाणी पाणी साचण्याच्या, 18 ठिकाणी शॉर्टसर्किटच्या आणि 5 ठिकाणी इमारतींच्या भिंती पडण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मात्र, कोणतीही प्राणहानी झालेली नाही. मुंबई महापालिका, अग्निशमन दल, पोलीस व एनडीआरएफच्या 5 टीम्स पूर्ण सज्ज आहेत.
हवामान खात्याने मुंबईसह कोकण विभागात पुढील 24 तास वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्य सचिवांसह सर्व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. एनडीआरएफ, एसडीआरएफ, अग्निशमन दल, महसूल व गृह विभाग यांना तातडीच्या उपाययोजनांसाठी नियंत्रण कक्षांच्या माध्यमातून कार्यरत राहण्यास सांगितले आहे.
तसंच जलसंपदा विभागाशी सतत समन्वय राखण्याचेही आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत. राज्य सरकार पावसामुळे निर्माण झालेल्या प्रत्येक परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, असे स्पष्ट संकेत यामधून मिळत आहेत.