रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात बाप-लेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. स्वतःच्याच दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला पोलिसांनी बेड्या ठोकल्य आहेत. या घटनेमुळे संपूर्ण माणगाव तालुक्यासह रायगड जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाळाराम मनोहर जाधव (वय ३२, रा. पडवण, ता. तळा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी बापाचे नाव आहे. आरोपी बाळाराम याने ऑक्टोबर २०२४ ते जून २०२६ या कालावधीत आपल्या ११ आणि १४ वर्षीय दोन अल्पवयीन मुलींवर वेळोवेळी बलात्कार केला.
जीवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार
आरोपीने म्हसळा तालुक्यातील पाबरा, तसेच तळा, माणगाव, पोलादपूर तालुका आणि सातारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी नेऊन दोन्ही मुलींवर लैंगिक अत्याचार केले. या संतापजनक प्रकाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी तो मुलींना देत होता. भीतीपोटी मुलींनी अनेक महिने हा प्रकार सहन केला. मात्र, अखेर पीडित मुलींच्या आईला या अत्याचाराची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ पोलिसांत धाव घेत आपल्या नराधम पतीविरोधात तक्रार नोंदवली.
पोक्सोसह भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल
पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून माणगाव पोलीस ठाण्यात आरोपी बाळाराम जाधव याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांनुसार आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केली आहे.
सदर प्रकरणाचा पुढील अधिक तपास माणगाव उपविभागीय पोलीस अधिकारी पवार व पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर पवार आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सचिन निमकर करत आहेत.








