ठाणे एटीएसने सर्वात मोठी कारवाई केली आहे. फरार इंडियन मुजाहिद्दिनच्या दहशतवादी तारीक खानच्या मुलीला एटीएसने अटक केली आहे. नमिरा तारीक खान असं या 21 वर्षीय तरुणीचं नाव असून तिला मुंब्र्यातून अटक करण्यात आली आहे.बनावट पासपोर्ट आधारे सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमध्ये प्रवास केल्याचा संशय आहे. आता एटीएसकडून तिच्या फरार आईचा शोध सुरू आहे.या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
फरार दहशतवाद्याच्या मुलीला अटक
नमिरा खान ही दोन वेळा बनावट पासपोर्ट आधारे सौदी अरेबिया येथे जाऊन आली. तिने खोट्या माहितीच्या आधारे पासपोर्ट मिळवले होते. नमिरा ही कुर्ला आणि लखनौच्या पत्तावरुन काढलेल्या बनावट पासपोर्टच्या आधारे सौदी अरेबियामध्ये जाऊन दहशतवादी वडिलांना भेटून आली होती. नमिराने खोट्या माहितीच्या आधारे पासपोर्ट मिळवले होते. तारीक खानची पत्नी शबनम उर्फ फिर्दोष तारीक खान देखील फरार आहे.
ATS दहशतवाद्याच्या पत्नीचाही शोध सुरु
आता तपास यंत्रणेकडून शबनम खानचा शोध सुरु आहे. नमिरा आणि तिची आई मुंब्र्यात काही दिवस वास्तव्यास होते. तारीकवर प्रतिबंधित संघटना सिमी, इंडियन मुज्जाहिद्दिन, बनावट नोटा, दहशतवादी कृत्य, देश विरोधी कृत्य असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तारिक गेल्या अनेक वर्षांपासून फरार आहे.
कोण आहे तारिक खान?
तारीक खान (मोहम्मद तारीक अंजुमन हसन) हा मूळचा बिहारचा रहिवासी असून तो व्यावसायिकदृष्ट्या एक सिव्हिल इंजिनिअर आहे. तो 1998 पासून प्रतिबंधित संघटना ‘सिमी’मध्ये सक्रिय होता. एवढंच नाही तर तारिक खान हा इंडियन मुजाहिद्दीनमधील रियाज भटकल,यासीन भटकलचा जवळचा सहकारी मानलं जायचं. तारिकने त्याच्या संपर्कातील अनेक तरुणांना पाकिस्तानमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ट्रेनिंग कँपमध्ये पाठवलं आहे. तो 2006 साली भारत-नेपाळच्या सीमेवर इंडियन मुजाहिद्दीनच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये सक्रिय होता. तिथेही अनेक तरुणांना ट्रेनिंगला पाठवण्याचा आरोप आहे.
अनेक तरुणांना मोबाईलवरून ट्रेनिंग द्यायचा
पुढे 2007 साली पुण्याच्या कोंढव्यात इंडियन मुजाहिद्दीनशी संबंधित अनेक संशयित दहशतवाद्यांना लपवल्याचा आरोप आहे. त्यावेळी तो देखील तिथेच होता. त्याने अनेक तरुणांना मोबाईलवरून ट्रेनिंग द्यायचा. सध्या नमिराला एटीएसने अटक केली आहे. नमिराचा शोध सुरू केल्यानंतर तिची आई शबनम फरार झाली. एटीएस आता शबनमच्या मागावर आहेत. तिनेही काही दिवसांपूर्वी पासपोर्टचे नुतनीकरण केल्याची माहिती मिळतेय.








