मुंबईतील मालाड पश्चिमेकडील मढ परिसर हा निसर्गरम्य वातावरण, धार्मिक स्थळे, ऐतिहासिक वारसा आणि समुद्रकिनाऱ्यांसाठी ओळखला जातो. श्री किलेश्वर मंदिर, ग्रामदैवत श्री हरबादेवी मंदिर, ऐतिहासिक किल्ला तसेच अक्सा, दानापाणी आणि सिल्व्हर बीच यामुळे मढ परिसराला पर्यटनाच्या दृष्टीनेही विशेष महत्त्व आहे.मात्र, गेल्या काही काळात मढ परिसरातील काही भागांमध्ये अवैध दारू आणि अमली पदार्थांची विक्री होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. या प्रकारांमुळे परिसरातील कायदा-सुव्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
मढच्या वेगवेगळ्या भागात अवैध दारूविक्री होत असल्याचा आरोप
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मढ परिसरातील वेगवेगळ्या भागांमध्ये अवैध दारूची विक्री होत असल्याची चर्चा आहे. काही ठिकाणी रात्रीच्या वेळेस संशयास्पद हालचाली होत असल्याचा दावाही नागरिकांकडून करण्यात येत आहे. पास्कलवाडी तलाव, मढ धक्का तळपशा बंदराकडे जाणाऱ्या मार्गासह परिसरातील इतर ठिकाणी प्रशासनाने विशेष लक्ष देऊन प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
गांजा आणि चरस विक्रीमुळे गुन्हेगारी वाढल्याचा नागरिकांचा दावा
गांजा आणि चरस विक्रीमुळे गुन्हेगारी वाढल्याचा नागरिकांचा दावा आहे. मढ धक्का तळपशा बंदराकडे जाणाऱ्या मुख्य रस्ता मढ, जेट्टी रोड वर एका मेडिकल समोर दिवसा एका व्यक्तीकडून दोन मुलांनी मारहाण करून पैसे घेऊन पळ काढल्याची घटना ताजी आहे. मढ परिसरातील काही ठिकाणी गांजा आणि चरसची विक्री होत असल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे.
तरुण व्यसनाच्या आहारी जात असल्याची चिंता
या अमली पदार्थांच्या कथित उपलब्धतेमुळे परिसरातील काही तरुण व्यसनाच्या आहारी जात असल्याची चिंता नागरिक व्यक्त करत आहेत. तसेच, अमली पदार्थांच्या सेवनाशी संबंधित व्यक्तींमुळे परिसरात चोरी आणि घरफोडीच्या घटना वाढल्याचा दावा काही स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीचीही चौकशी करण्याची मागणी
नागरिकांकडून आणखी एक गंभीर मागणी करण्यात येत आहे. संबंधित भागात बेकायदेशीर व्यवसाय होत यात प्रशासन यांची हफ्तेखोरी सुरू आहे., संबंधित अधिकाऱ्यांच्या कॉल डिटेल रेकॉर्ड्स (CDR), अधिकृत संपर्क आणि संबंधित व्यक्तींशी झालेल्या संवादाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काही नागरिकांकडून होत आहे.
पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करण्याची मागणी
अमली पदार्थांच्या कथित विक्रीबाबत संबंधित पोलीस यंत्रणेने तातडीने चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी. त्याचबरोबर अवैध दारूविक्रीच्या तक्रारींची राज्य उत्पादन शुल्क विभागानेही दखल घ्यावी, अशी नागरिकांची मागणी आहे. परिसरात नियमित गस्त वाढवणे, संशयास्पद ठिकाणी तपासणी करणे आणि नागरिकांकडून आलेल्या तक्रारींची नोंद घेऊन त्यावर कारवाई करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
मढची ओळख पर्यटन आणि संस्कृतीची राहावी
मढ परिसराची ओळख ही धार्मिक श्रद्धास्थाने, ऐतिहासिक वारसा, समुद्रकिनारे आणि निसर्गरम्य वातावरण अशी आहे. अवैध दारू किंवा अमली पदार्थांच्या कथित विक्रीमुळे या परिसराची प्रतिमा खराब होऊ नये, यासाठी प्रशासनाने वेळीच कठोर आणि पारदर्शक कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. या सर्व आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नसून, संबंधित पोलीस विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि प्रशासनाने चौकशी केल्यानंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
प्रशासनाकडून कठोर कारवाईची मागणी
आता मढ परिसरातील सुरू असलेले अवैध चरस,गांजा विक्री असो की अवैध दारू विक्री प्रशासन कितपत गांभीर्याने दखल घेते आणि संबंधित ठिकाणी कोणती कारवाई केली जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.








