मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी cjp चे मुंबईत जोरदार आंदोलन करण्यात आलं. महाराष्ट्र सरकारने शिवाजी पार्कमध्ये आंदोलन करण्यास परवानगी दिलेली नव्हती. तेव्हा अशा परिस्थितीत, सीजेपीने शिवाजी पार्कच्या बाहेर आंदोलन सुरू केलं. आंदोलनात तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. पण यावेळी मुंबईच्या रस्त्यांवरील या आंदोलनात सामील होण्यासाठी एक बॉलिवूड स्टार दाखल झाले होते जे पाहून सर्वांनाच धक्का बसला.
अभिनेते नसीरुद्दीन शाह आंदोलनात सहभागी
अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी आंदोलनादरम्यान अभिजीतची भेट घेतली.ते आंदोलनात आलेले पाहताच उपस्थित सर्वांनाच धक्का बसला. अभिजीतने या भेटीचा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला, ज्यामध्ये त्याने लिहिले आहे, ‘मी स्वप्न पाहतोय का?’… बॉलिवूड अभिनेते नसीरुद्दीन शाह आपल्या स्पष्टवक्त्या मतांसाठी ओळखले जातात.
नसीरुद्दीन शाह यांनी अभिजीतला मिठी मारली
कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात नसीरुद्दीन शाह यांना पाहताच अभिजीत थेट त्यांच्या पाया पडला. तेव्हा नसीरुद्दीन शाह यांनी अभिजीतला मिठी मारली. अभिजीतने वारंवार त्यांच्याबद्दलची आपली प्रशंसा व्यक्त केली. त्यावर नसीरुद्दीन शाह यांनी आपणही त्याचे मोठे चाहते असल्याचे सांगितले. त्यानंतर या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने अभिजीतचे अभिनंदन केले आणि त्याच्या कामाबद्दल त्याचे आभारही मानले.
ज्ञानेश कुमार राजीनामा देईपर्यंत आंदोलन सोडणार नाही
कॉकरोच जनता पार्टीचे शिवाजी पार्कबाहेर आंदोलन सुरूच असूनज्ञानेश कुमार राजीनामा देईपर्यंत आंदोलन सोडणार नसल्याचं CJP ने स्पष्ट केलं आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉकरोच जनता पक्षाने सुरू केलेल्या या मोहिमेवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.ते म्हणाले की, “सर्वप्रथम, मला हे स्पष्ट करायचे आहे की त्यांचा संपूर्ण कट उघडकीस आला आहे. तीन निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेनंतर त्यांचा खोटा वृत्तांत उघड झाला आहे. असे असूनही, हा खोटा वृत्तांत पुढे नेण्याचे प्रयत्न केले जात आहेत. ते यात यशस्वी होणार नाहीत.” असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी या आंदोलनाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता या आंदोलनाचे मुंबईत काय पडसाद उमटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








