Police in Nanded seized a massive cache of sharp weapons नांदेड जिल्ह्यात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत ग्रामीण पोलिसांनी मोठी आणि धक्कादायक कारवाई केली आहे. बुधवारी रात्री पोलिसांनी धाड टाकत तब्बल ४ हजार ७९६ घातक शस्त्रांचा साठा जप्त केला असून, नांदेडच्या इतिहासातील ही सर्वात मोठी शस्त्रजप्ती मानली जात आहे.
या कारवाईत तलवारी, खंजीर, कुकरी, गुत्या आणि फोरग्रीप खंजिरांसह मोठ्या प्रमाणात शस्त्रनिर्मितीचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत तब्बल ४३ लाख ५० हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री बळीरामपूर भागात अभिजित गिरीधर सातपुते याच्याकडून पोलिसांनी एक घातक शस्त्र जप्त केले होते. त्यानंतर पोलिसांनी आरोपीची सखोल चौकशी केली. या चौकशीतून मोठ्या शस्त्रसाठ्याचे धागेदोरे समोर आले.
त्यानंतर नांदेड ग्रामीणचे ठाणेदार ओमकांत चिंचोलकर यांच्या पथकाने वजिराबाद पोलिसांच्या मदतीने गुरू रामदासनगर परिसरात छापा टाकला. या धाडीत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला.
जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांमध्ये ३५० तलवारी, ३ हजार ९५२ खंजीर, ३३८ गुत्या, २८ कुकरी आणि २८ फोरग्रीप खंजिरांचा समावेश आहे. याशिवाय शस्त्रनिर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचताच एका व्यक्तीने तेथून पळ काढला. प्राथमिक तपासात हा संपूर्ण शस्त्रसाठा जसवंतसिंग प्रकाशसिंग सुखमणी, रा. अबचलनगर याने जमा केल्याचे समोर आले आहे. फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
या मोठ्या कारवाईमुळे नांदेडसह संपूर्ण मराठवाड्यात खळबळ उडाली असून, इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा नेमका कशासाठी जमा करण्यात आला होता, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.








