भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात मोठी दुर्घटना घडली आहे. नारपोली गंगाराम वाडी येथील कोहिनूर अपार्टमेंट ही चार मजली अतिधोकादायक ठरवलेली इमारत गुरुवारी रात्री साडे अकरा वाजताच्या दरम्यान कोसळली आहे. या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला आहे,अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.पिलरच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना इमारत कोसळल्याची माहिती मिळत असून भिवंडी अग्निशमन दल तसेच पोलिसांकडून बचावकार्य सुरु आहे. या इमारतीचं नाव कोहिनूर असून 12 ते 14 वर्ष जुनी असल्याची माहिती आहे. या इमारतीला महापालिकेनं धोकादायकची नोटीस बजावली होती.
बचाव सुरू करण्यास अडथळे
दरम्यान घटनेची माहिती मिळतात पालिका आपत्कालीन कक्ष अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी धावून आले.परंतु इमारतीपर्यंत पोहोचण्यासाठी अरुंद रस्ता असल्या कारणाने बचाव सुरू करण्यात अडथळे येत होते. त्यानंतर रात्री एक वाजता घटनास्थळी एनडीआरएफचे पथक व टीडीआरएफ दाखल झाले. इमारतीच्या सुरुवातीला असलेली एक जुनी चाळ जेसीबीच्या सहाय्याने तोडून काढल्यानंतर दुर्घटग्रस्त इमारतीपर्यंत यंत्रणा पोहोचली. त्यानंतर बचाव कार्य करण्यासाठी सुरुवात केली आहे.
इमारत धोकादायक घोषित केली होती
कोहिनूर अपार्टमेंट ही 2007 मध्ये बनवण्यात आली असून, या इमारतीमध्ये दोन अपार्टमेंट आहेत. एका अपार्टमेंटमध्ये 15 असे एकूण 30 रूम या इमारतीमध्ये आहेत. परंतु, कमकुवत काम असल्याने सुरुवातीपासूनच इमारत धोकादायक झाल्याने पालिकेने ही इमारत धोकादायक घोषित केली होती. या इमारतीच्या एका विंगच्या तळमजल्यावर काही पिलर नादुरुस्त झाल्याने त्याची दुरुस्ती केली जात असल्याने सायंकाळी सहा वाजतापासूनच इमारतीला तडे जाण्यास सुरुवात झाली होती.
VIDEO | Bhiwandi Building Collapse: Fifth body recovered from the rubble of the collapsed building. Operations continue to rescue those still trapped.#BhiwandiBuildingCollapse #MaharashtraNews
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/6pIqXDPmRw
— Press Trust of India (@PTI_News) July 31, 2026
वीज कनेक्शन आणि पाणी कनेक्शन तोडल्यानंतरही काहीजण इमारतीमध्ये राहत होते
त्यामुळे रात्री आठ वाजता इमारत एका बाजूने झुकत असल्याने पालिका प्रभाग समिती क्रमांक चारचे सहाय्यक आयुक्त अरविंद घोगरे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होत इमारत निर्मनुष्य केली. तसेच महापालिकेने वीज कनेक्शन आणि पाणी कनेक्शन तोडल्यानंतरही काहीजण इमारतीमध्ये राहत असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान तळमजल्यावरील दुरुस्ती काम सुरू होतं तेव्हाही काही कुटुंबातील व्यक्ती साहित्य घेण्यासाठी इमारतीमध्ये आले होते त्याच दरम्यान दुर्घटना घडली.
ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून शर्तीचे प्रयत्न
सध्या घटनास्थळी एनडीआरएफ आणि पोलीस बचावकार्य करत आहेत. लोकांची गर्दी घटनास्थळी जमत असल्याने बचावकार्याला अडथळा निर्माण होत आहे.
त्यांना पोलिस बंदोबस्त घेऊन बाहेर काढण्यात आले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केली जात आहेत.








