लातूर-मुरूड महामार्गावर बोरगाव काळे नजीक मंगळवारी रात्री एक अत्यंत भीषण आणि काळीज पिळवटून टाकणारा अपघात घडला आहे. भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत २६ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
काळीज पिळवटून टाकणारा अपघात
बोरगाव काळे मुरूडकडून लातूरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारने मोटारसायकलला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला असून यात एका २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी (२९ सप्टेंबर) रात्री ७ वाजण्याच्या सुमारास बोरगाव काळे येथील पेट्रोल पंपाजवळ घडला.
एक ठार, दोन जण गंभीर जखमी
या भीषण अपघातामध्ये महादेव भाऊसाहेब पांचाळ (वय २६, रा. रामेगाव ता. जि. लातूर) या तरुणाचा लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. शाम दयानंद पांचाळ (वय २०) आणि शशिपाल शिवाजी काशीकर (वय १९, दोघेही रा. रामेगाव) हे दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. मुरुड पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती.
दुचाकीचा पूर्णत: चक्काचूर झाला
पाेलिसांनी सांगितले, मुरूड येथून लातूरकडे जाणारी कार (जी.जे. ०५ जे.एस. ८५१४) आणि पेट्रोल पंपावर कामासाठी येणाऱ्या तिघांची दुचाकी (एम.एच. १४ जी.पी. ६९२६) यांच्यामध्ये हा भीषण अपघात झाला.मिळालेल्या माहितीनुसार, शाम पांचाळ आणि शशिपाल काशीकर हे दोघे बोरगाव काळे येथील पेट्रोल पंपावर रात्रीच्या ड्यूटीसाठी जात होते. त्यांना सोडण्यासाठी महादेव पांचाळ हा आपल्या मोटारसायकलवरून (क्रमांक: MH 14 GP 6926) सोबत आला होता. पेट्रोल पंप अवघ्या हाकेच्या अंतरावर असतानाच समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने (क्रमांक: GJ 05 JS 8514) दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, दुचाकीचा पूर्णत: चक्काचूर झाला, तर कारच्या डाव्या बाजूचे मोठे नुकसान झाले.
तीन-चार महिन्यांपूर्वीच झाले होते महादेव पांचाळचे लग्न…
बोरगाव काळे नजीकच्या पेट्रोलपंपावर कामासाठी आलेल्या दोन मित्रांना सोडण्यास महादेव पांचाळ हा तरुण निघाला हाेता. पेट्रोलपंप अवघ्या दोन मिनिटांच्या अंतरावर असतानाच त्याच्यावर काळाने घाला घातला. महादेव पांचाळ याचे तीन-चार महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. अंगावरची हळदही निघाली नव्हती, अशातच त्याला अपघाती मृत्यूने गाठले. या अपघाताने पांचाळ कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
उपचारादरम्यान महादेव पांचाळ यांची प्राणज्योत मालवली
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तिन्ही जखमींना मुरूड येथील चांडक रुग्णालयात दाखल केले. मात्र, सर्वांचीच प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना रुग्णवाहिकेने लातूर येथील शासकीय सर्वोपचार रुग्णालयात हलवण्यात आले. दुर्दैवाने, उपचारादरम्यान महादेव पांचाळ यांची प्राणज्योत मालवली.
३-४ महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न; रामेगाववर शोकाकुल कळा
मृत महादेव पांचाळ याचे अवघ्या ३ ते ४ महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. अंगावरची हळदही नीट वाळली नसतानाच काळाने त्याच्यावर असा अचानक घाला घातल्याने रामेगाव परिसरावर आणि पांचाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अवघ्या दोन मिनिटांच्या अंतरावर असलेल्या मित्रांना सोडण्यासाठी निघालेल्या महादेवचा असा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी मुरूड पोलीस ठाण्याच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली असून, या अपघाताबाबत पोलिसांत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.









