नाशिक जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आला असून अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफ तैनात करण्यात आले आहे. खबरदारी म्हणून शाळा-कॉलेजलाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी अधिक पाऊस पडण्याची तसेच अतिवृष्टी, ढगफुटीसदृश परिस्थिती, पूरस्थिती, भूस्खलन, नैसर्गिक आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. खबरदारी म्हणून नाशिकमध्ये NDRF पथक तैनात करण्यात आलेले आहे. नाशिक जिल्ह्यासाठी जारी करण्यात आलेला इशारा विचारात घेता शाळा आणि शैक्षणिक संस्थाना शनिवारी १ ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
नाशिकमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाकडून काही आदेश जारी करण्यात आले आहेत.
शाळांना सुट्टी
खबरदारीचा उपाय म्हणून नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, नांदगाव, बागलाण, कळवण, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा या तालुक्यांमधील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, अंगणवाड्या, आश्रमशाळा, अनुदानित, विनाअनुदानित, खासगी शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना शनिवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. नदी, नाले, ओढे, धरणे, तलाव, जलाशय, पूल, गड-किल्ले, घाट परिसर, पूरप्रवण भाग, डोंगर उतार आणि भूस्खलन संभाव्य भागात जाणे टाळावे.
पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे पूर्णपणे बंद
जिल्ह्यातील सर्व धबधबे, धबधबा परिसर, ट्रेकिंग पॉईंट्स, नदीकाठ, पर्यटनस्थळे आणि पूरप्रवण धार्मिक स्थळे पुढील आदेशापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात येत आहेत, नागरिकांना या ठिकाणी जाण्यास मनाई करण्यात आली आहे. संबंधित महसूल, पोलीस, वन विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी आवश्यक बॅरिकेडिंग करून प्रवेश प्रतिबंधित करावा.
सर्व आठवडी बाजार, जत्रा, मेळावे आणि मोठ्या सार्वजनिक गर्दीचे कार्यक्रम स्थगित करण्यात येत आहेत.
नागरिकांचे 100 टक्के सुरक्षित स्थळी स्थलांतर
महानगरपालिका आयुक्त, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी व ग्रामपंचायती यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सखल, पूरप्रवण व भूस्खलनाच्या धोक्याच्या भागातील नागरिकांचे 100 टक्के सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. आवश्यकतेनुसार निवारा केंद्रे सुरू करून अन्न, पिण्याचे पाणी, औषधे व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सर्व रुग्णवाहिका कार्यरत ठेवाव्या. पूरप्रवण भागातील उच्च जोखीम असलेल्या गर्भवती महिलांची ओळख पटवून आवश्यकतेनुसार त्यांना सुरक्षित आरोग्य संस्थेत आगाऊ दाखल करण्याची कार्यवाही करावी. पशुसंवर्धन विभागाने पूरप्रवण भागातील जनावरांच्या सुरक्षित स्थलांतराची, चारा, पिण्याचे पाणी, पशुवैद्यकीय उपचार व तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करावी.
आवश्यक बॅकअप व्यवस्था
महावितरण कंपनीने धोकादायक भागात आवश्यकतेनुसार वीजपुरवठा सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद अथवा पूर्ववत करण्याबाबत तात्काळ कार्यवाही करावी. तसेच विद्युत वाहिनी / हायटेन्शन वायर, इत्यादीमुळे दुर्घटना होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी.
सर्व दूरसंचार सेवा प्रदात्यांनी मोबाइल आणि इंटरनेट सेवा अखंडित राहतील यासाठी आवश्यक बॅकअप व्यवस्था आणि तांत्रिक पथके सज्ज ठेवावीत.
सर्व नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. केवळ भारतीय हवामान विभाग, राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे.








