धाराशिवमध्ये राजकारण चांगलेच तापलेलं पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील तेरखेडा गावात जिल्हा परिषद निवडणुकीच्या कारणातून सत्ताधारी महायुतीतील शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)या दोन्ही गटात तुफान राडा झाला. एवढंच नाही तर या राजकीय वादातून झालेल्या दोन गटात दगडफेकही झाली आणि इनोव्हा, फॉर्च्युनर आणि थार यांसारख्या 10 ते 12 आलिशान गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.पोलिसांनी दोन्ही गटांतील ४५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आमदार तानाजी सावंत आणि माजी आमदार राहुल मोटे यांचे गट आमनेसामने
आमदार तानाजी सावंत आणि माजी आमदार राहुल मोटे यांचे गट आमने- सामने आले. आमदार तानाजी सावंत गटातील कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद निवडणुकीत मिळालेल्या विजयाचा उन्माद चढला आहे. या राजकीय गर्वातूनच सावंत गटाच्या कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक हल्ला घडवून आणला आणि गाड्यांची तोडफोड केली, असा थेट आरोप राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी तथा मोटे गटाने केलानं केला आहे.
दोन्ही गटाचे विधानसभा आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालावरून राडा
तर विधानसभा आणि जिल्हा परिषद निवडणुकीतील पराभव जुन्या प्रस्थापितांना पचवता येत नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते वारंवार वाद उकरून काढत आहेत. हा सर्व प्रकार माजी आमदार राहुल मोटे यांच्या सांगण्यावरूनच घडवून आणला जात आहे. इतकेच नाही तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्याच गाड्या फोडून आमच्यावर खोटे आरोप केले आहेत, असा प्रत्यारोप सावंत गटाने केला आहे.
दोन्ही गटांच्या ४५ जणांविरोधात गुन्हा दाखल
या प्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारी दिल्या नसल्याने पोलिसांनी या प्रकरणात स्वतःहून तक्रार दाखल केली. पोलिसांकडून दोन्ही गटांच्या ४५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या हिंसक घटनेनंतर दोन्ही बाजूंपैकी कोणीही अधिकृतपणे परस्परविरोधी तक्रार देण्यासाठी पुढे आले नाही. घटनेतील मुख्य आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरात विशेष शोध मोहीम सुरू केली असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तेरखेडा गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.








